गुरुप्रसाद दळवी
इलेक्शनमध्ये कुणाची हवा, याची जोरदार चर्चा सुरू असतानाच पर्यटनात मात्र आता गोव्यापेक्षा कोकणचीच जास्त हवा दिसत आहे. स्वच्छ, प्रशस्त समुद्रकिनारे, वॉटरस्पोर्टसची धमाल आणि चविष्ठ मालवणी मेनुमुळं कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक गोव्याला पहिली पसंती देतात. मात्र यावेळी गोव्यापेक्षा कोकणात पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. सलग सुट्ट्या आणि काही भागातील निवडणुकांचा ताण संपल्यानं बच्चेकंपनीसह पर्यटक कोकणात येताना दिसत आहेत. स्वच्छ आणि प्रशस्त समुद्रकिनारे, बच्चेकंपनीसाठी वॉटरस्पोर्टस आणि रशरशीत मालवणी मेनूवर यथेच्छ ताव मारण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गोव्याच्या तुलनेत कोकणातले समुद्रकिनारे सुंदर आणि प्रशस्त आहेत. बहुतेक ठिकाणी पर्यटनाच्या आधुनिक सोई निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं गोव्याच्या तुलनेत इथंच पर्यटक रमताना दिसत आहेत. कोकणच्या पर्यटनाची राजधानी असणा-या मालवणला सर्वाधिक पसंती असते. याही वर्षी मालवण, देवबाग, तारकर्ली, चिवला बीच पर्यटकांनी फुलुन गेला आहे. तसंच निवास व्यवस्थाही फुल्ल झाली आहे. मालवणसोबतच भोगवे, वेंगुर्ला, शिरोडा हे बीचही पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत.
बहुतेक समुद्र किना-यांवर आता वॉटरस्पोर्टची सुविधा आहे. त्यामुळं बच्चेकंपनी या वॉटरस्पोर्टसचा आनंद लुटताना दिसत आहे. पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे ती मालवणी मेनुला. ताज्या माशांपासुन बनवलेले रशरशीत मालवणी पदार्थ पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं स्थानिकांना रोजगार तर उपलब्ध झाला आहेच, मात्र कोरोनात संपुर्ण ठप्प झालेला कोकणातला पर्यटन व्यवयाय आता नव्यानं उभारी घेताना दिसत आहे.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्याला लागूनच गोवा आहे. मात्र पर्यटक गोव्याला जाणं पसंत करत होते. मात्र सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या सोयीसुवीधा, विमानसेवा, यामुळे पर्यटक गोव्या बरोबरच कोकणात येणेही पसंत करत आहेत. सध्या सुट्ट्यांचा काळ आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत. ही कोकणवासींसाठी दिलासा देणारा बाब आहे. पर्यटकांनी कोकणात यावे यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या जात होत्या. त्याला आता यश आले आहे. पर्यटकांची वाढणारी संख्या ही नक्कीच सुखावणारी आहे.