जाहिरात

Mumbai News :नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा विस्तार; इंडिगो अन् अदाणी एअरपोर्ट्सची मोठी घोषणा

इंडिगोकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMIA) दररोज होणारी १२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्यात येणार आहे.

Mumbai News :नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा विस्तार; इंडिगो अन् अदाणी एअरपोर्ट्सची मोठी घोषणा

Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) फेब्रुवारी २०२७ पासून इंडिगोची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या विमानतळावरील आपली उपस्थिती वाढविण्यासाठीची योजना कार्यान्वित करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याची घोषणा इंडिगो आणि अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) यांनी संयुक्तपणे केली. यामुळे दोन्ही कंपन्यांमधील भागीदारी अधिक मजबूत होईल आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) दुहेरी विमानतळ प्रणालीला आणखी बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विस्ताराचा भाग म्हणून, इंडिगो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMIA) दररोज होणारी १२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. 

सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहरीन, रियाध, दम्माम, जेद्दाह, मदिना, कुवेत, रास अल खैमाह, फुजैराह, मस्कत, ढाका आणि जकार्ता या गंतव्यस्थानांसाठी सुरू असलेल्या सर्व विमानसेवांचा समावेश असेल. याशिवाय, काठमांडूसाठी दररोज एक अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात येईल. त्यामुळे फेब्रुवारी ते जुलै २०२७ या कालावधीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे जाळे १२ गंतव्यस्थानांपर्यंत विस्तारतील.

प्रवासासाठी अखंडित कनेक्टिव्हिटी

या आंतरराष्ट्रीय विमानसेवांना आवश्यक असलेली देशांतर्गत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी इंडिगो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आवश्यक देशांतर्गत विमानसेवाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी अखंडित कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. इंडिगोच्या निकट सहकार्याने, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवांदरम्यान प्रवाशांना सुरळीत आणि कार्यक्षम हस्तांतरणाचा अनुभव मिळावा, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड करत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय हब म्हणून विकसित करण्याच्या इंडिगोच्या विस्तार धोरणातील हे पुढचे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षमतेचे हे स्थलांतर आणखी दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांना पूरक ठरेल. पहिलं म्हणजे, यामुळे इंडिगोला २०२७ मध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा विस्तार सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल. त्यामुळे वाढत्या A320/321 आणि A321XLR विमानांच्या ताफ्याचा वापर करून २०२७ मध्ये आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील नवीन विमानसेवा सुरू करता येतील. तसेच, आधीच क्षमतेच्या मर्यादांमध्ये काम करणाऱ्या विमानतळावर अतिरिक्त ताण पडणार नाही. दुसरे म्हणजे, देशांतर्गत विमानसेवांचे संबंधित स्थलांतर २०३० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T1 टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेतील कपातीमध्ये इंडिगोचा वाटा पूर्ण करण्यास मदत करेल. T1 टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी इंडिगोच्या सेवांमध्ये आणखी काही बदल करणे आवश्यक ठरल्यास, त्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मिनलमध्ये सामावून घेण्यासाठी इंडिगो आणि अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यापुढेही एकत्रितपणे काम करतील.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनही आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी विस्तारणार

या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या स्थलांतराचा उद्देश मुंबईच्या दुहेरी विमानतळ प्रणालीमध्ये क्षमतेचे पारदर्शक, न्याय्य आणि प्रमाणबद्ध पुनर्संतुलन साधणे हा आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रत्येक विमान कंपनीच्या उपस्थितीचा विचार केला जाईल. या संतुलित दृष्टिकोनामुळे सर्व विमान कंपन्यांसाठी सुव्यवस्थित संक्रमण सुलभ होईल, कामकाजातील अडथळे कमीत कमी होतील आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार सुरू असताना तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकासाचे काम पुढे जात असताना विमान कंपन्या आणि प्रवाशांना नियोजनासाठी अधिक निश्चितता मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवांचे स्थलांतर आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या अंतिम तारखा, प्रकल्पाशी संबंधित समन्वयाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक कार्यकारी मंजुरी मिळाल्यानंतर इंडिगोकडून जाहीर केल्या जातील. या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनही आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी अधिक विस्तारतील. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दोन्ही विमानतळांद्वारे अधिक व्यापक आणि सक्षम सुविधा उपलब्ध होतील.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com