रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News :पुण्यात सध्या एकाच महिलेच्या अनेक वादग्रस्त कृत्यांची चर्चा आहे. गौरी वांजळे असं या महिलेचं नाव आहे. तिची कहाणी म्हणजे 'एक बाई आणि बारा भानगडी' अशा स्वरूपाची आहे. पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, गुंगीचे औषध देणे, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, आणि ॲसिड हल्ला करणे अशा एकामागून एक गंभीर घटनांमुळे ही महिला चर्चेत आली आहे. पुणे शहर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात सध्या 3 वेगवेगळे गुन्हे दाखल असून, तिने केवळ पुरुषांनाच नाही तर अनेक गरजू महिलांनाही 'वकील' असल्याचे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
काय आहे प्रकरण?
गौरी वांजळे हिने पुरुषांवर केलेल्या अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. तिने अनेकांना आपले लक्ष्य बनवून त्यांना गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले.एका विवाहित व्यक्तीला तिने आधी जबरदस्तीने जवळीक साधायला लावली, त्याचे खासगी फोटो काढले आणि नंतर ब्लॅकमेल केले. हा प्रकार इथेच थांबला नाही; त्यानंतर तिने त्या व्यक्तीच्या अंगावर ॲसिड देखील फेकले. एवढे सगळे होऊनही तिने त्या व्यक्तीशी लग्न करून त्याला धमक्या देणं सुरूच ठेवले.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात सावकार मोकाट; पैसे परत देऊनही जमीन बळकावली, तरुणांनं उचललं टोकाचं पाऊल )
'वकील' म्हणून लाखो रुपयांची फसवणूक
पुरुषांवरील अत्याचारासोबतच, गौरी वांजळेने कायदेशीर मदतीच्या नावाखाली अनेक महिलांना लुबाडले आहे. 'मी वकील आहे, तुमचे काम त्वरित करून देते,' असे सांगून तिने अनेकांकडून मोठी रक्कम उकळली.
एका महिलेला, जिचा भाऊ तुरुंगात आहे, त्याला सोडवून देण्याचे आश्वासन देऊन तिने त्या महिलेकडून तब्बल 1.5 लाख रुपये घेतले.
दुसऱ्या एका महिलेच्या घराच्या मालकीवरून सुरू असलेला वाद सोडवण्याचे आश्वासन देत तिने जवळपास 3.5 लाख रुपयांना गंडा घातला, असाही या वांजळेवर आरोप आहे.
( नक्की वाचा : Psycho Killer : 4 मुलांची हत्या करणाऱ्या पूनमनं मुलाचं नाव शुभम का ठेवलं? कुटुंबीयांनी सांगितलं भयंकर सत्य )
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणानुसार, गौरी वांजळेने पती-पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू असलेल्या एका केसमध्ये मदत करण्याचे आमिष दाखवले. तिने फिर्यादी व्यक्तीला (वय 38 वर्षे) जवळीक साधत 'मी हाय कोर्टामध्ये वकील आहे, तुम्हाला मदत करते' असे सांगितले. त्यानंतर, त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करत तिने त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. मुंढवा पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
यापूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनमध्येही गौरी वांजळेच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तिने एका पुरुषाला 'भाऊ' म्हणत आपलेसे केले आणि नंतर या ना त्या कारणाने त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, तिने त्या पुरुषावर पुणे, कोल्हापूर आणि काशी विश्वेश्वर येथे अत्याचार केले. इतकेच नाही तर, धमक्या देऊन तिने त्या पुरुषाकडून सोन्याची अंगठी देखील जबरदस्तीने काढून घेतली.
सध्या तिच्या विरोधात तीन गंभीर गुन्हे दाखल असूनही गौरी वांजळेला अद्याप अटक झालेली नाही. या सगळ्यामुळे पीडित नागरिक आणि इतर लोकांनी तिच्या तातडीच्या अटकेची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world