जाहिरात

Beed Crime : फोन करून सांगितलं'कार्यक्रम ओके'! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

Beed Crime News: बीडमध्ये पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर अपघाताचा बनाव रचणाऱ्या आरोपींनी 'कार्यक्रम ओके' असा एकमेकांना कॉल करून गुन्ह्याची कबुली दिली होती.

Beed Crime : फोन करून सांगितलं'कार्यक्रम ओके'! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

आकाश सावंत, बीड

प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे आणि आरोपींनी एकमेकांना केलेल्या एका 'कोडवर्ड' कॉलमुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. लिंबागणेश परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे.

अपघाताचा रचला होता बनाव

किरण सोनवणे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या अंगावर दुचाकी पडलेली होती, ज्यामुळे प्रथमदर्शनी हा रस्ते अपघात असावा असे वाटत होते. मात्र, मृतदेहाची स्थिती पाहून नेकनूर पोलिसांना संशय आला. त्यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात किरण यांचा मृत्यू अपघाताने नाही, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

(नक्की वाचा-  मित्राचा जेवणाचा डब्बा पाहून विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे धाव, पालकांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्याच्या आईला अटक)

प्रेमसंबंध आणि पतीचा जाच

पोलिसांनी मृताची पत्नी प्रियंका सोनवणे हिच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तपासात समोर आले की, प्रियंकाचे दशरथ परदेशी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पती किरण हा आपल्या दोघांच्या प्रेमात अडसर ठरत आहे आणि तो आपल्याला जाच देत आहे, असा प्रियंकाचा समज होता. याच कारणातून तिने प्रियकर दशरथ आणि त्याचा मित्र धीरज येडे यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.

(नक्की वाचा-  Crime News: सोशल मीडियावर 'शो-ऑफ' पडला महागात! प्रसिद्ध महिला युट्यूबरच्या घरावर दरोडा; कुटुंबाला खोलीत कोंडलं)

'कार्यक्रम ओके' आणि पनवेल कनेक्शन

घटनेच्या रात्री आरोपींनी किरण यांचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला दुचाकीखाली दाबून टाकला. हत्या यशस्वी झाल्यानंतर आरोपींनी एकमेकांना फोन केला आणि 'कार्यक्रम ओके'असा निरोप दिला. हा तांत्रिक पुरावा पोलिसांच्या हाती लागताच आरोपींचे बिंग फुटले. गुन्हा केल्यानंतर तिन्ही आरोपी फरार होऊन पनवेल येथे लपून बसले होते. पोलिसांनी आरोपींचे लोकेशन शोधले आणि पनवेलमध्ये सापळा रचून पत्नी प्रियंका, प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे या तिघांना बेड्या ठोकल्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com