प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Raigad Politics Latest News : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात मागील काही महिन्यांपासून राजकीय धुमश्चक्री सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच झाल्याचंही समोर आलं होतं. अखेर आदिती तटकरे यांनीच पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावर बाजी मारली. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात कोल्ड वॉर सुरु झालं. अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या या दोन्ही घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या जवळच्या आणि विश्वासू नेत्याला मोठं पद दिलं आहे. सुशांत गणेश जाबरे असं या नेत्याचं नाव आहे. ते महाडचे प्रभावी युवा नेते आणि कुणबी समाजातील उदयोन्मुख नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. सुशांत जाबरे यांची यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने गोगावलेंना मोठा धक्का बसला आहे.
सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर काय घडलं?
सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यानंतर काही आठवड्यांमध्येच त्यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. जाबरे यांना दिलेली ही जबाबदारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) धोरणात्मक हालचालींचा एक भाग मानला जात आहे.
नक्की वाचा >> मुंबईहून 'या' ठिकाणी निघालेल्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी! विमानात होते 176 प्रवासी, पुढे काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाबरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही घोषणा केवळ सन्मानाची नसून, महाडमधील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी “गेम चेंजर” ठरू शकतो. सुशांत जाबरे हे महाड तालुक्यातील कुणबी समाजाचे प्रभावशाली प्रतिनिधी मानले जातात. तरुण, ऊर्जावान आणि सामाजिक उपक्रमांमधून सक्रिय असलेल्या जाबरे यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांचा संघटनात्मक दृष्टिकोन आणि जनसंपर्कामुळे ते स्थानिक राजकारणात युवा चेहरा म्हणून उदयास आले आहेत.
नक्की वाचा >> Delhi Blast: 'या' अभिनेत्रीने दिल्ली स्फोटात गमावली सर्वात जवळची मैत्रिण, म्हणाली, "मागच्या आठवड्यातच तिने.."
या नियुक्तीमुळे भरत गोगावले गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण जाबरे हे गोगावले यांचे “विश्वासू” म्हणून ओळखले जात होते. मात्र, गोगावले यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना योग्य स्थान न दिल्याची नाराजी गोगावले शिबिरात आधीपासून होती. त्यामुळे जाबरे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. जाबरे यांचा पक्षप्रवेश करून सुनील तटकरेंनी महाडच्या राष्ट्रवादीला बळकटी मिळवून दिली आहे. तटकरे यांनी स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभं करण्यासाठी गोगावले गटातील नेत्याला मोठी जबाबदारी दिली आहे.