नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघ आपापल्या पहिल्या विश्वविजयासाठी उत्सुक आहेत. भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर मात केली. ४५,३०० प्रेक्षक क्षमता असलेल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारताची कामगिरी या स्पर्धेत उत्कृष्ट राहिली आहे. येथे भारत एकही सामना हरलेला नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवले आहेत, तर बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर यापूर्वी कधीही सामना खेळलेला नाही. विश्वचषकातील हे दोन्ही अंतिम फेरीतले संघ स्पर्धेच्या लीग टप्प्यात ९ ऑक्टोबरला भिडले होते, ज्यात दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात नादिन डी क्लर्कने नाबाद ८४ धावा आणि दोन विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, एकूण हेड-टू-हेड आकडेवारीत भारताचे पारडे जड आहे. त्यांनी ३४ एकदिवसीय सामन्यांपैकी २० सामने जिंकले आहेत.