कोल्हापुरात तब्बल पाच तास सुरु असलेलं काँग्रेसच आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. किणी टोल नाका येथे अनावश्यक टोलविरोधात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. रस्त्यांची दुरावस्था असतानाही टोल का आकारला जातो, असा सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून टोल आकारणीमध्ये सूट देणार असल्याचं पत्राद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. या सवलतीनंतर आता कोल्हापूरकरांसह महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सकाळी 10 वाजता सुरू झालेलं आंदोलन तब्बल पाच तास सुरू होतं. पुणे-बंगळूरू महामार्गावर 4 टोल नाक्यांवर काँग्रेसने आंदोलन केले. पुण्याच्या खेडशिवापूर, साताऱ्याच्या आनेवाडी आणि तासवडे, कोल्हापुरातील किणी या चार टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार सतीश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू बाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सांगली, हातकणंगले, इचलकरंजीमधील नेते आणि पदाधिकारी सामील झालेले होते.
'एकतर रस्ते दुरुस्त करा अन्यथा टोल बंद करा', अशी घोषणा या आंदोलनात करण्यात आली. दरम्यान किणी टोल नाक्यावर काही काळ वाहतूक ठप्प झालेली होती. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून या टोल आकारणी मध्ये सूट दिल्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर काँग्रेसकडून आंदोलन मागे घेण्यात आले.
(नक्की वाचा - Satara News : प्रशासनाचा आदेश धाब्यावर, सेल्फी प्रेमी तरुणी दरीत पडली)
आमदार सतेज पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, पुणे ते बंगळूरु मार्गावर अनेक खड्डे आहेत. या रस्त्याची दुरावस्था सध्या आहे. अनेक अपघात या मार्गावर होत आहेत. रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे. असं असूनही या राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारणी करून प्रवाशांना जाचक कर लादला जात आहे. त्यामुळे हा अनावश्यक टोल बंद व्हावा यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून एक पत्र देण्यात आल आहे. या पत्रामधून आता प्रवाशांना टोल मध्ये सवलत देणार असल्याचं पत्राचा आधार घेत पाटील यांनी सांगितले.
टोल आकारणीमध्ये मिळालेली सवलत
आमदार पाटील यांनी पत्र वाचून दाखवत नेमकी किती सूट देण्यात आली आहे याची माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडून टोल आकारणीमध्ये 25% सूट देण्यात आली आहे. तसेच किणी टोलनाका परिसरापासून 20 किलोमीटरपर्यंत क्षेत्रात 100 टक्के सवलत असेल असेही महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेल्या आजच्या आंदोलनाला यश मिळाला असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. मात्र अद्यापही आमचा लढा संपला नसल्याचेही पाटील म्हणाले.
(नक्की वाचा- गटारी पार्टी जीवावर बेतली; 5 मित्र गाडीसह नदीत बुडाले, एकाचा मृत्यू तर एकजण बेपत्ता)
रस्त्यांसाठी सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम
केंद्र सरकारकडे आम्ही रस्ते दुरुस्तीबाबत प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याचबरोबर टोल आकारणी मध्ये 50 टक्के सवलत मिळावी असा पत्रव्यवहार देखील केंद्र सरकारशी करत आहोत. पुढच्या 15 दिवसात या महामार्गावरील रस्ते दुरुस्त करावे असा अल्टिमेटम देखील काँग्रेसकडून सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर आता रस्ते दुरुस्तीला वेग येणार का याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिला आहे.