प्रविण मुधोळकर
विमानातून प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकांचं ते स्वप्न पूर्ण होतं काहीचं ते स्वप्न स्वप्नच राहतं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर विमानाने प्रवास करणं म्हणजे अगदीच महागडं ठरतं. विमान प्रवासाच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे अनेक जण विमान प्रवास टाळतात. त्या ऐवजी बस किंवा ट्रेन प्रवासाला ते प्राधान्य देतात. पण आता काही मार्गावरील विमान प्रवासाच्या तिकीटात कमालीची घट झालेली दिसते. त्यामुळे या मार्गावर तुम्हाला बिनधास्त विमान प्रवास करता येईल.
उन्हाळ्यात विमानाच्या उड्डाणा प्रमाणेच त्याचे दर ही आकाशाला भिडलेले होते. पण आता हेच विमानाचे तिकीट दर पावसाळ्यात घसरल्याचं दिसत आहे. दोन महिन्यापूर्वीचा विचार केल्यास नागपूर ते मुंबईचा विमान प्रवास तब्बल 20 हजारांच्या घरात होता. एक ट्रीपसाठी 20 हजार रूपये खर्च करावे लागत होते. त्यामुळे इतका महागडा प्रवास करण्या पेक्षा अनेकांनी बस आणि रेल्वेची वाट धरली होती. पण आता हा प्रवास सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्याला कारण म्हणजे या विमान प्रवासाच्या तिकीट दरात झालेली कमालीची घसरण आहे.
नागपूर ते मुंबई हे 20 हजाराला मिळणार तिकीट आता 4 हजार 100 रुपयांवर आले आहे. त्यामुळे नागपूर मुंबई प्रवास हा सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. मुंबई नागपूर प्रमाणेच, नागपूर दिल्ली या मार्गावरील विमानाचे तिकीट ही महागडे होते. ते सर्व सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे होते. पण तेच तिकीट आता साडे पाच हजार ते सहा हजारांच्या घरात मिळत आहे. त्यामुळे नागपूर दिल्ली हा विमान प्रवास ही स्वस्त झाला आहे.
तर प्रवासी संख्ये अभावी नागपूर ते गोवा, पुणे, इंदूर,हैदराबाद या मार्गावरील तिकीटातही घसरण झाली आहे. पावसाळ्यात शाळा महाविद्यालय सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत घसरण झाली आहे. म्हणून विमान कंपन्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करत आहेत. ऑनलाईन वेबसाइटवर नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद या मार्गावर तिकिटाचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसेल.