Ajit Pawar Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2024मध्ये खराब हवामानात राज्यातील काही प्रमुख नेत्यांसह हेलिकॉप्टरने गडचिरोलीपर्यंत केलेल्या प्रवासातील तणावपूर्ण क्षणांचा एक किस्सा तेव्हा सांगितला होता. नागपूरहून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने पोहोचल्यावर त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात हा थरारक अनुभव सांगितला होता. या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंतही होते. हा किस्सा हवाई प्रवासातील एका भयावह अनुभवाशी संबंधित असला तरी पवार यांनी तो आपल्या खास विनोदी शैलीत सांगितला होता.
अजित पवार या हवाई प्रवासादरम्यान प्रचंड घाबरले होते
पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झालाय. अजित पवार यांनी सांगितलं की, हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान ते अतिशय घाबरले होते, कारण दाट ढगांमुळे बाहेर काहीही दिसत नव्हते. पण फडणवीस पूर्णपणे शांत होते आणि त्यांनी पवारांना सांगितले की यापूर्वीही अशा प्रकारच्या सहा भयावह परिस्थितींचा सामना त्यांनी हवाई प्रवासादरम्यान केलाय. फडणवीस यांनी त्यांना शांत राहण्यास सांगत काहीही वाईट होणार नाही, असे आश्वासन दिले होते. ही घटना 17 जुलै 2024 रोजी घडली होती. त्या दिवशी हे तीनही नेते नागपूरहून गडचिरोली येथे 'सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेले होते.
फक्त ढग आणि ढगच दिसत होते : अजित पवार
कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर सभेला संबोधित करताना पवार म्हणाले होते, "जेव्हा आम्ही नागपूरहून हेलिकॉप्टरने निघालो तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक होते. पण नंतर हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरले आणि मी आजूबाजूला पाहिले तर सर्वत्र फक्त ढगच ढग दिसत होते आणि आमचे देवेंद्र फडणवीस तिथे आरामात बसून गप्पा मारत होते." ते पुढे म्हणाले होते, "मी त्यांना म्हणालो बाहेर पाहा, आपल्याला काहीच दिसत नाही. ना झाडे, ना जमीन, काहीच नाही. फक्त ढगच दिसतायेत. आपण नक्की कुठे चाललो आहोत?"
अजित पवार पुढे म्हणाले की, "त्यावर त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले की अजिबात काळजी करू नका. अशा सहा घटना मी याआधी अनुभवल्या आहेत. मी जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये असतो, तेव्हा काही अपघात झाला तरी मला काहीच होत नाही. त्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. मनातल्या मनात मी विचार केला ‘हे काय बोलत आहेत?' माझी भीती आधीच वाढत होती. तो दिवस आषाढी एकादशीचा होता, त्यामुळे मी मनातल्या मनात सतत "पांडुरंग, पांडुरंग" असा जप करत होतो आणि हे महाराज (फडणवीस) मला सल्ले देत होते."
सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर देवाचे मानले आभार
फडणवीस यांनी काळजी करू नका असे सांगितल्यामुळे मी शांत झालो आणि प्रत्यक्षात काहीही वाईट घडले नाही, असेही पवार यांनी सांगितले होते. अजित पवार असंही म्हणाले की,"आपण सुरक्षितपणे इथे पोहोचलो, हे त्यांच्या घरातील थोरांचे पुण्यकर्मांचेच फळ आहे. त्याच चांगल्या कर्मांमुळे आम्हाला मदत मिळाली. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर आम्ही सर्वच खूप घाबरलो होतो. उदय सामंत माझ्या उजवीकडे बसले होते आणि ते म्हणाले 'दादा, दादा, पाहा, शेवटी जमीन दिसायला लागली आहे.' तेव्हा मी म्हणालो - 'देवाचे लाख लाख आभार, आता जमीन दिसतेय.' विनोद बाजूला ठेवला तर, सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.”