योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Inspirational Story : अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुणीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रज्ञा पुरणमल इंगळे असं या तरुणीचं नाव आहे. तिने जिद्दीच्या जोरावर मोठं यश संपादन केलं आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस अर्थात आयटीबीपी (ITBP)या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तिची निवड झाली आहे. तसच तिचं प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.विशेष म्हणजे प्रज्ञाने पहिल्याच प्रयत्नात ‘वर्दी' मिळवत इतिहास रचला आहे. डोंगरगावातून (ITBP) मध्ये निवड होणारी ती पहिली महिला सैनिक ठरली आहे. त्यामुळे गावात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपयशावर मात करत स्वप्न साकार
प्रज्ञाचे वडील गवंडी म्हणून मजुरी करतात. तर आई सुद्धा मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. अशा सामान्य परिस्थितीत वाढलेल्या प्रज्ञाने लहानपणापासूनच सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. मागील दोन-तीन वर्षे ती सैन्य भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. पण तिला काही वेळा अपयश आले.तरी तिचा यश मिळवण्याचा ठाम निर्धार कमी झाला नाही. दररोज पहाटे पाच वाजता उठून रनिंग,व्यायाम आणि कठोर सराव हा तिचा नित्यक्रम बनला होता.शारीरिक तयारीसोबत अभ्यासातही तिने सातत्य ठेवले.‘फौजी' होण्याचं स्वप्न तिने मनापासून जपलं आणि त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. अखेर तिची जिद्द आणि मेहनत फळाला आली.
नक्की वाचा >> Akola News: सरकारच्या 'त्या' कराराविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं, अकोल्यात 36 ठिकाणी रास्ता रोको, प्रकरण काय?
गावकऱ्यांचा जल्लोष, कुटुंबाचा अभिमान
प्रज्ञाच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात तिचं स्वागत आणि सत्कार केला. निर्मल ज्ञान बुद्ध विहार येथे सामूहिक त्रिशरण ग्रहण करून तिचा गौरव करण्यात आला.“माझ्या मुलीच्या निवडीनं ऊर अभिमानानं भरून आला आहे. तिने प्रचंड मेहनत घेतली,” अशा भावना तिचे वडील पुरणमल महादेव इंगळे यांनी व्यक्त केल्या.स्वतः प्रज्ञानेही आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत गुरुजन आणि ग्रामस्थांचे आभार मानले. अविरत शारीरिक कसरत,सातत्यपूर्ण सराव आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाल्याचे ती म्हणाली.प्रज्ञाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.