Ambernath News: अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील युतीचा पेच आता अधिकच गडद झाला असून, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. युतीच्या चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत मिठाई तर आली, पण ती वाटली गेली नाही, यावरूनच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपाला युतीसाठी का विचारायचे, असा सवाल उपस्थित करत शिंदे गटातील एका गटानं उघड नाराजी व्यक्त केली आहे.
बहुमत असताना युती कशासाठी?
अंबरनाथ नगर परिषदेत सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, अशी भूमिका घेत सुनील चौधरी यांनी भाजपाला युतीची ऑफर दिली होती. मात्र, त्यांच्या या निर्णयाला पक्षांतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष राजू वालेकर यांनी तर सुनील चौधरी यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.
मिठाई आली पण वाटली गेली नाही
युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही पक्षांकडून युतीचे संकेत मिळाल्याने बैठकीच्या ठिकाणी मिठाई देखील मागवण्यात आली होती. मात्र, ऐन वेळी युतीचा निर्णय फिस्कटला आणि मिठाई न वाटताच बाजूला ठेवण्यात आली. या गोंधळामुळे अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपा युतीबाबतचा सस्पेन्स आता अधिकच वाढला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीत घरांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; संरक्षण खात्याच्या जमिनीवर बांधल्या चाळी, शेकडो.. )
अरविंद वालेकर यांचा खळबळजनक खुलासा
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील काही लोकांना आधीपासूनच भाजपसोबत जायची इच्छा होती, मात्र तेव्हा ते शक्य झाले नाही, आता तेच लोक आतून खेळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्याकडे बहुमत असताना आपण युतीची मागणी का करावी? ती मागणी भाजपाने करायला हवी होती, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पक्ष मोठा करणाऱ्या शिवसैनिकांनी शिवसेनेची बाजू ठामपणे मांडली पाहिजे, असा टोलाही त्यांनी आपल्याच नेत्यांना लगावला.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव )
वरिष्ठांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
सुनील चौधरी यांची युतीसाठीची आग्रही भूमिका आणि अरविंद वालेकर यांनी व्यक्त केलेली नाराजी यामुळे शिवसेना शिंदे गटात दोन उभे गट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. बैठकीतून राजू वालेकर यांचे मध्येच निघून जाणे, हे देखील या वादाचेच प्रतीक मानले जात आहे. आता या स्थानिक वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, यावरच अंबरनाथमधील युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.