Ambernath News: अंबरनाथ शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या माजी आमदारांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि प्रतिकात्मक गुढ्या भाजपा नगरसेवकांनी साभार परत पाठवल्या आहेत. या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून विकासकामांच्या मुद्द्यावरून हा वाद अधिक चिघळल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयांचे पडसाद आता थेट अशा प्रकारे उमटत आहेत.
काय आहे कारण?
अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 13 मार्च रोजी पार पडली. या सभेत शिवसेनेने आपल्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली. मात्र याच वेळी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे नामंजूर करण्यात आली, असा आरोप भाजप गटाकडून केला जात आहे.
शिवसेनेने सभागृहात केलेल्या या खेळीमुळे भाजप नगरसेवक कमालीचे नाराज झाले आहेत. स्वतःला महायुतीचे घटक म्हणवून घेताना विकासकामांच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची भावना भाजपाच्या गोटात निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: तुमची सोसायटी सुरक्षित आहे? कल्याणमध्ये घरकाम करणारे आणि फेरीवाले पोलिसांच्या रडारवर, कारण काय? )
विकासकामांची गुढी हवी होती
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सदिच्छा म्हणून अंबरनाथमधील भाजपच्या सर्व नगरसेवकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू पाठवल्या होत्या. मात्र ही भेट स्वीकारण्यास भाजपने नकार दिला.
आम्हाला शुभेच्छांच्या गुढीऐवजी विकासकामांची गुढी हवी होती, अशी तिखट प्रतिक्रिया भाजप नगरसेविका अनिता भोईर आणि सुजाता भोईर यांनी दिली आहे. शिवसेनेने केवळ राजकीय सूडबुद्धीतून भाजपच्या प्रभागातील कामांना विरोध केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांचे मोठे यश! महागड्या LPG ला रामराम; आता घरच्या घरी तयार होणार गॅस! वाचा काय आहे संशोधन )
श्रीकांत शिंदेंच्या टीमवर निशाणा
व्हिजनमॅन म्हणून ओळख असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या नगरसेवकांनी सभागृहात भाजपच्या कामांना नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या विकासकामांना विरोध केला आहे, अशी टीका भाजपच्या महिला नगरसेविकांनी केली आहे. नागरिकांची कामे रोखून अशा प्रकारे शुभेच्छा पाठवणे हा केवळ देखावा असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन मित्र पक्षांमधील दरी आता अधिक स्पष्ट झाली आहे.