KDMC News : कल्याण डोंबिवली महापालिकेनं 15 ऑगस्ट रोजी मांसं विक्री बंदीचा निर्णय घेतला आहे. या दिवशी जन्माष्टमी असल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. या निर्णयाला मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध होत आहे. विरोधकांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना लक्ष्य केलं आहे. गोयल यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली. त्यामुळे आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा कल्याण-डोंबिवलीत सुरु आहे.
काय केलं वक्तव्य?
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी मांस बंदीचा जो निर्णय घेतला आहे. तो फार चुकीचा आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नवीन सिंह यांनी केली. त्यानंतर या विषयावर बोलताना त्यांनी 'अंग्रेज गये और अपनी औलाद छोड गये', असे खळबळजनक वक्तव्य महापालिका आयुक्तांबाबत केलं.
सिंह यांनी यावेळी सांगितलं की, शहरात खाटीक समाज मोठ्या प्रमाणात आहे. आयुक्तांच्या या बंदी आदेशामुळे त्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. आयुक्तांनी अशी शपथ घेतली पाहिजे. 1988 चा भ्रष्टाचार विराेधी कायदा आहे. 15 तारखेला सगळ्या महापालिका अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनी शपथ घ्यावी की, कल्याण डोंबिवली महापालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही. रस्त्यावर खड्डे पडले आहे. या कामात जो भ्रष्टाचार झाला आहे. त्याला जबाबदार जो कोणी कंत्राटदार आहे.त्याच्यावर कारवाई करणार. तिथेही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही अशी शपथ घेतली पाहीजे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेत अनधिकृत बांधकामे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही ही देखील शपथ त्यांनी घेतली पाहिजे.
( नक्की वाचा : Raju Patil : 15 ऑगस्टला 'मॅकडोनाल्ड, KFC बंद करणार का?' राजू पाटील यांचा KDMC ला संतप्त सवाल )
भाजपा नेत्यानं दिलं आव्हान
दरम्यान, भाजप पदाधिकारी संतोष होळकर यांनीही आयुक्त अभिनव गोयल यांच्यावर टीका केली. "केडीएमसी हद्दीत सलग 500 मीटर लांबीचा एकही खड्डा नसलेला रस्ता जो कोणी दाखवेल, त्या नागरिकाला किंवा अधिकाऱ्याला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी दहा हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल,'' अशी घोषणा होळकर यांनी केली.
काही दिवसांपूर्वी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे भरले गेलेले नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.