School Holiday On August 20: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसंच पालघर जिल्ह्याला मंगळवारी (19) पावसाचा चांगलाच फटका बसला.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने ठाणे आणि नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी (ऑगस्ट 20) सुट्टी असेल. तर मंगळवार रात्री 10:00 वाजेपर्यंत, मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करणारे कोणतेही परिपत्रक मुंबई महापालिकेनं (BMC) काढलेलं नाही. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट खोटी असल्याचं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं आहे. ॉ
ठाण्यात शाळेला सुट्टी
ठाणे महानगरपालिका (TMC) ने रात्री 9:20 वाजता X वर परिपत्रक पोस्ट केले.त्यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यासंबंधीचे अधिकृत आदेश देण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Thane Rain : बाप रे बाप... पावसामुळे ठाण्यातल्या रस्त्यांवर तरंगू लागले साप ! पाहा भीतीदायक Video )
या परिपत्रकार दिलेल्या माहितीनुसार, ‘सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि निर्माण झालेल्या अत्यंत कठीण परिस्थितीमुळे, कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना (प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) 20/08/2025 रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून, मी ठाणे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, महानगरपालिका शाळा, विनाअनुदानित शाळा, सर्व अंगणवाड्या, आश्रम आणि सर्व महाविद्यालये, तसेच व्यावसायिक आणि प्रशिक्षण केंद्रांना 20/08/2025 रोजी आपत्कालीन व्यवस्थापन सुट्टी जाहीर करत आहे.'
नवी मुंबई, पालघर शाळेला सुट्टी
यापूर्वी, पनवेल महानगरपालिकेनेही परिपत्रक पोस्ट करून त्यांच्या हद्दीतील शाळांना सुट्टी असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि पालघर महानगरपालिकेनेही त्यांच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मंगळवारी, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर कोकण, मुंबई, तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसाठी 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई व्यतिरिक्त, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरसाठी देखील हा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने 22 ऑगस्टपर्यंत या भागात 40-50 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, "19 आणि 20 ऑगस्ट रोजी उत्तर कोकण (मुंबईसह), दक्षिण गुजरात राज्य आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे; 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्येही अतिवृष्टीची शक्यता आहे. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण (मुंबईसह) आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता आहे."
हवामान विभागाने सांगितले की, दक्षिण ओडिशातील कमी दाबाच्या प्रभावामुळे हे घडत आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांत द्वीपकल्प आणि लगतच्या मध्य भारतावर मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यापूर्वीच सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आणि ट्रेनला उशीर झाल्याने शहरात जनजीवन विस्कळीत झाले.
शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त, मंगळवारी मुंबईतील सर्व सरकारी आणि निम-सरकारी कार्यालये बंद राहिली, तर खाजगी कार्यालये आणि आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना देण्यात आली होती.