Ashok Kharat Case: नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अशोक खरात या भोंदूबाबाच्या कारनाम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या भोंदूबाबाच्या संपर्कात अनेक मोठ्या आणि नामांकित व्यक्ती होत्या, अशी माहिती समोर आल्यानंतर एसआयटीने अनेकांची चौकशी सुरू केली आहे. याच दरम्यान नाशिकमधील एका अत्यंत नामांकित हॉटेल व्यावसायिकाचे नाव या प्रकरणाशी जोडले गेल्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले होते.
शैलेश कुटे यांच्या नावाची का चर्चा?
नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शैलेश कुटे यांना एसआयटीने चौकशीसाठी बोलावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर, भोंदूबाबा अशोक खरात आणि शैलेश कुटे यांच्यात नेमके काय संबंध आहेत? त्यांच्यात काही मोठे आर्थिक व्यवहार झाले होते का? किंवा खरात हा कुटे यांच्या हॉटेल्समध्ये येत-जात होता का? असे अनेक प्रश्न नाशिककरांमध्ये चर्चिले जाऊ लागले. मात्र, या सर्व चर्चांमागचे खरे सत्य आता तपासाशी संबंधित सूत्रांकडून समोर आले आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
संशयित किंवा आरोपी म्हणून नव्हे, तर तपासात सहकार्यासाठी संपर्क
तपासाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने शैलेश कुटे यांच्याशी कोणताही गुन्हा किंवा संशयावरून संपर्क साधलेला नव्हता. भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि पोलीस तपासात सहकार्य व्हावे, यासाठी केवळ एक माहितीचा स्त्रोत म्हणून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. एसआयटीच्या प्राथमिक चौकशीमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ती म्हणजे शैलेश कुटे आणि अशोक खरात यांच्यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार किंवा व्यावसायिक संबंध नव्हते. तसेच, खरात कधीही कुटे यांच्या हॉटेलमध्ये आला नसल्याची माहितीही आता अधिकृतपणे समोर आली आहे.
लग्नाचे निमंत्रण होते, पण उपस्थिती नव्हती
या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजते की, अशोक खरात याने आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण शैलेश कुटे यांना दिले होते. परंतु, कुटे यांनी या विवाह सोहळ्याला आपली उपस्थिती लावली नव्हती, असे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. यावरून भोंदूबाबा खरात आणि कुटे यांच्यात केवळ औपचारिक किंवा तोंडओळख असण्यापलीकडे कोणताही जवळचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हॉटेल व्यवसायात अत्यंत कमी कालावधीत उल्लेखनीय यश आणि मोठी प्रतिष्ठा मिळवलेल्या शैलेश कुटे यांचे नाव या वादात विनाकारण ओढले गेल्याची भावना आता त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणातून काही विरोधकांकडून त्यांना जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर बदनाम करण्यासाठी या प्रकरणात त्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही आता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे.