आईच्या ऑपरेशनसाठी घराबाहेर पडला, पोलिसांनी आंदोलक म्हणून पकडला; खंगलेल्या वडिलांची मुलाच्या जामिनासाठी धावपळ

अटक करण्यात आलेल्यांमधले काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज, क्लास यांचे आयकार्ड सापडले आहेत. काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीटं आणि पास सापडले आहेत. काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत. मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
बदलापूर:

निनाद करमरकर

चिमुकल्या मुलींवरील अत्याचार (Badlapur Case)  प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर (Rail Roko Protest) पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय. भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काहीही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच ससेहोलपट झाली आहे.

डॉक्टरांकडे जायला निघाला, घरी आलाच नाही

बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे. मोतीबिंदू दूर करण्यासाठी ऑपरेशनची गरज असून त्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण 20ऑगस्ट रोजी घराबाहेर पडला होता. आईची फाईल घेऊन बदलापूरहून तो अंबरनाथला जाणार होता. मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कात्रपच्या दिशेने पळत सुटले. या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली. यातच भूषण दुबे यालाही पोलिसांनी पकडलं.

Advertisement

मित्राच्या फोनमुळे अटकेची बातमी कळाली

पोलिसांनी जेव्हा भूषणला पकडलं तेव्हा त्याने विनंती, गयावया करून पोलिसांना सांगितलं की त्याची काहीही चूक नसून तो कोणत्याही आंदोलनात सहभागी झालेला नाही. त्याने त्याच्याकडे असलेली आईची हॉस्पिटलची फाईलही पोलिसांना दाखवली. मात्र तरीही पोलिसांनी त्याला सोडलं नाही असा आरोप भूषणचे वडील कमताप्रसाद यांनी केला आहे. डॉक्टरांकडे जातो असे सांगून घराबाहेर पडलेला भूषण उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या घरचे थोडे चिंतेत होते. भूषणच्या एका मित्राने त्याच्या वडिलांना रात्री फोन करून त्याला अटक झाल्याची बातमी दिली होती. भूषणला कोणी अटक केलीय, कशासाठी अटक केलीय आणि त्याला कुठे नेलाय हे त्याच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हते.  अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असे कमताप्रसाद दुबे सांगितले.

Advertisement

आजारी वडिलांची न्यायालयात धावपळ

भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत होते.  या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही. भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे कापलेले आहेत. त्याही अवस्थेत त्यांना मुलाच्या जामिनासाठी धावपळ करावी लागत होती. आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे. बदलापूर आंदोलना प्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केलेत. यामध्ये ज्यांना अटक केली आहे त्यातील बहुतेकांनी आपण आंदोलनात नव्हतोच असे म्हटले आहे.  अटक करण्यात आलेल्यांमधले काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज, क्लास यांचे आयकार्ड सापडले आहेत. काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीटं आणि पास सापडले आहेत. काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत. मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा दावा वकील, सत्यन पिल्ले यांनी केला आहे.

Advertisement

Topics mentioned in this article