ठाणे शहर वडापावसाठी प्रसिद्ध आहे. इथे गजानन, राजमाता, कुंजविहार, अष्टविनायक आणि रुची वडापाव जॉईंट्स आहेत. प्रत्येक ठिकाणाची खासियत वेगळी आहे, जसे तंदूरी वडापाव आणि जंबो वडापाव. ठाण्यात वडापाव खाणे अनिवार्य आहे.
ठाणे हे जसे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे रसिकांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ठाणेकरांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी संस्कृती जपणारे शहर म्हणूनही या शहराची ओळख सांगितली जाते. इथली खाद्यसंस्कृतीही गेल्या काही वर्षात बहरत गेली आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील खाद्यप्रेमींची पहिली पसंती ही वडापावला असते. वडापावची चव ज्याने एकदा चाखली की तो अखेरच्या श्वासापर्यंत ती विसरत नाही. मऊ लुसलुशीत पाव, आंबट गोड, तिखट ओली चटणी, सोबतीला सुकी तिखट चटणी, कांदा. मधोमध नीटपणे कापलेल्या पावामध्ये भरलेला गरमागरम वडा असं दृश्य दिसलं की भूक नसलेल्या माणसाचीही तपस्या भंग होते. बाहेर रिपरिप पडणारा पाऊस आणि त्यात गरम-गरम वडापाव, सोबतीला चहा किंवा कॉफी हे कॉम्बिनेशन स्वर्गसुखाचा आनंद देणारे ठरते. ठाण्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाने आवर्जून ट्राय करायलाच हवे असे चविष्ट वडापाव कोणते ते आपण पाहूया.
1. गजानन वडापाव, नौपाडा
नौपाड्यातील गजानन वडापाव हे नाव माहिती नाही असा ठाणेकर सापडणे दुर्मिळच आहे. इथे वडापावसोबत पिवळी पातळ चटणी आणि ठेचा दिला जातो. पाव इतका मऊ असतो की तोंडात टाकताच तो विरघळतो. इथे कधीही गेलात तरी तुम्हाला गरम वडाच मिळणार याची खात्री असते. वडापावसाठी इथे खवय्यांची रांग लागलेली असते. इथली कांदा तसेच बटाटा भजीदेखील फेमस आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील इथला वडापाव आवडतो
पत्ता: छत्रपती संभाजी रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम
वेळ: सकाळी 7:30 ते रात्री 9:30
किंमत: 15 रुपये प्रति वडापाव
खासियत: पिवळी चटणी आणि कांदा भजी
2. राजमाता वडापाव सेंटर, नौपाडा
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील राजमाता वडापाव सेंटर हे देखील सदैव ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेले ठिकाण आहे. इथे वडापावसोबत मिळणारी पिवळी चटणी गजानन वडापावपेक्षा वेगळी आहे. या चटणीची टेस्टही वेगळी आणि सुंदर आहे. इथेही कायम गरमागरम वडे मिळतात. वड्यांसोबत इथला समोसाही प्रसिद्ध आहे.
पत्ता: श्रीधर बिल्डिंग, राम मारुती रोड, घंटाळी, ठाणे पश्चिम
वेळ: सकाळी 9:00 ते रात्री 10:00
किंमत: 15 रुपये प्रति वडापाव
खासियत: पिवळी चटणी आणि समोसा
3. कुंजविहार वडापाव शॉप, ठाणे स्टेशनजवळ
कुंजविहार हे ठाण्यातील जुन्या आणि प्रसिद्ध वडापाव मिळणाऱ्या ठाण्यातील ठिकाणांपैकी एक आहे. कुंजविहारने जंबो वडापाव प्रसिद्ध केला. एक वडापाव खाल्ला की जेवलं नाही तरी चालेल इतका मोठा वडापाव ही इथली खासियत. लाल लसणाची चटणी आणि तळलेल्या ठसकेदार मिरच्या तोंडीला असल्या की या वडापावची चव भन्नाट लागते. ठाणे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असल्याने इथेही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते.
पत्ता: ठाणे रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे पश्चिम
वेळ: सकाळी 8:00 ते रात्री 10:00
किंमत: 20 रुपये प्रति जंबो वडापाव
खासियत: जंबो वडापाव आणि लाल चटणी
4. अष्टविनायक कट्टा, ठाणे पूर्व
वडापावप्रेमींची संख्या वाढल्याने वडापावच्या आधुनिक प्रकारांची संख्याही वाढली आहे. तंदूरी वडापाव हा त्यापैकीच एक फेमस प्रकार आहे. ठाण्यातील अष्टविनायक कट्टा इथला तंदूरी वडापाव भन्नाट आहे. तंदूरी ग्रिलवर वडा भाजला जातो त्यावर बार्बेक्यू सॉस आणि चुरा टाकला जातो आणि मग पावात भरून तो ग्राहकांना दिला जातो. घास घेण्यासाठी वडापाव तोंडाजवळ येताच एक मस्त स्मोकी स्मेल येतो. पावसात तर हा वडापाव खायला जाम मजा येते.
पत्ता: अष्टविनायक चौक, राजलक्ष्मण सोसायटी, ठाणे पूर्व
वेळ: दुपारी 12:00 ते रात्री 10:00
किंमत: 50 रुपये प्रति वडापाव
विशेष: तंदूरी वडापाव आणि पनीर पाणिनी
5. रुची वडापाव, शास्त्रीनगर, वर्तक
रुची वडापाव हा लहानसा वडापाव जॉईंट आहे. हा जॉईंट छोटा आहे पण स्वच्छता आणि टापटीप ही इथली खासियत आहे. वडापावबद्दल बोलायचे झाल्यास पावाला लाल चटणी, ठेचा चोपडला जातो वड्यासोबत चुराही पावामध्ये सारला जातो. या वडापावची चव युनिक आहे.
पत्ता: शास्त्रीनगर, वर्तक, ठाणे
वेळ: दुपारी 4:00 ते रात्री 9:00
किंमत: 20 रुपये प्रति वडापाव
विशेष: लाल चटणी, चुरा आणि ठेचा