BJP MLA Ram Kadam : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे पसरणाऱ्या ज्या गंभीर आजारावर जगात औषध नाही, त्यानेच आपल्या आईचा बळी घेतल्याची धक्कादायक आणि भावुक माहिती भाजप आमदार राम कदम यांनी मंगळवारी थेट विधानसभेत दिली. मुंबईत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कबुतरांच्या विष्ठेतून जीवघेणे आजार पसरत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ज्या मातेने जन्म दिला, तिला या आजारामुळे यातना सहन करताना मी पाहिले आहे; जे माझ्या बाबतीत घडले, ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये, अशा शब्दांत त्यांनी सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाले कदम?
आमदार राम कदम यांनी सांगितले कि, कबुतरांच्या विष्ठेमध्ये (मल) अत्यंत सूक्ष्म कण, फंगस आणि बॅक्टेरिया असतात. हे कण श्वासाद्वारे मानवी शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे अत्यंत गंभीर आजार निर्माण होतात. वैद्यकीय भाषेत याला आयएलडी म्हणजेच 'इंटरस्टीशियल लंग डिजीज' (ILD) असे म्हणतात. या फुफ्फुसांच्या संसर्गावर ठोस औषधोपचार उपलब्ध नाही. याच गंभीर आजारामुळे आपल्या आईचे निधन झाल्याचा खुलासा त्यांनी केला.
(नक्की वाचा : BMC News: 4 वर्षे काम करूनही कमी पडलो, पावसाळ्यातील 'त्या' जीवघेण्या धोक्यावर पालिका आयुक्तांची मोठी कबुली )
या समस्येवर बोलताना त्यांनी प्राणी-पक्ष्यांबद्दलची आपली भूतदयाही स्पष्ट केली. कबुतरांचे दाणापाणी अचानक बंद करणे हा यावर उपाय नाही, असे सांगत त्यांनी जपान आणि इतर देशांमधील संशोधनाचा दाखला दिला. परदेशात मनुष्य आणि कबुतरे सुरक्षितपणे एकत्रित राहू शकतात, असे तंत्रज्ञान आहे. मुंबईत बोरिवली नॅशनल पार्कमध्ये तब्बल 50 एकर जागा उपलब्ध आहे, तिथे या कबुतरखान्यांचे रिलोकेशन (स्थलांतर) का केले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )
तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी
या गंभीर विषयावर राज्य सरकारने तातडीने कायमस्वरूपी आणि सुरक्षित धोरण बनवावे, अशी मागणी राम कदम यांनी केली. या प्रकरणी तज्ज्ञांची एक विशेष समिती नेमली जावी, जी कबुतरांमुळे होणारे मानवी मृत्यू कसे टाळता येतील याचा अभ्यास करेल, असे त्यांनी सुचवले.