संजय तिवारी
गेल्या काही महिन्यापासून बुलडाण्यातील अनेक गावात केसगळतीची समस्या ग्रामस्थांना जाणवत होती. केस का गळत आहेत याची कारणं ही शोधली जात होती. पण अचानक उद्भवलेल्या या समस्येचे कारण काही कुणाला सापडत नव्हते. पण आता त्याचे खरे कारण समोर आले आहे. या मागे पंजाब इथला गहू असल्याचं समोर आलं आहे. विख्यात संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. शिवाय केस गळण्यासाठी पंजाबच्या होशियारपूरचे गहू कसे कारणीभूत आहेत हे ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विख्यात संशोधक डॉ हिंमतराव बावस्कर यांनी अखेर बुलडाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणावरून पडदा हटवला आहे. एनडीटीव्ही मराठी सोबत Exclusive बोलताना डॉ बावस्कर म्हणाले की पंजाब येथून आलेल्या रेशन गव्हामध्ये सेलिनियम धातूचे प्रमाण कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे बुलडाण्यातील लोकांवर केसगळतीचे संकट ओढवले आहे. पंजाब राज्यातील होशियारपूर येथून आलेला गहू हा सेलेनियम युक्त आहे. यात सेलिनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत आता चौकशी झाली पाहिजे असं ही ते म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील मातीत देखील सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे. मात्र इथल्या पिकात तितके सेलेनियम प्रमाण नाही. पंजाबच्या शेतातील गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण हे प्रमाणा पेक्षा जास्त आहे. ते जास्त का याचा तपास वेळेवर झाला पाहीजे असही बासस्कर म्हणाले. पंजाबचा हा गहू रेशनद्वारे इतरत्र देखील गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाने याचा पाठपुरावा करून पंजाब येथून आलेल्या रेशनच्या गव्हात सेलेनियमच्या प्रमाणाची तपासणी करावी असा सल्लाही बावस्कर यांनी दिला आहे. ते नागपूरात बोलत होते.
बुलडाण्यातील बाधित पट्ट्यातील शेतजमिनीमध्ये सेलेनियम धातूचं प्रमाण आश्चर्यकारकरित्या वाढलं आहे. शिवाय त्यात झिंकमध्ये घट झाल्याने केसगळती होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी संशोधनाअंती हा निष्कर्ष काढला आहे. सेलेनियम हे खनिज मानवी शरीरासाठी आवश्यक असतो.मात्र हे खनिज प्रमाणात असेल तर मानवी शरीरासाठी उपयुक्त ठरतं. जर या खनिजाचं प्रमाण जास्त झाल्यास उलट्या होणे, केस गळती, नखांचे रंग फिके पडणे आदी लक्षणं दिसून येतात. याशिवाय हे खनिज प्रमाणाबाहेर झाल्यास मज्जा संस्था, श्वसन, हृदय आणि किडनीचे विकार संभवतात. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कितीतरी गावांमध्ये लोकांच्या डोक्यावरील केस गळण्यामागे हे कारण असल्याचं सांगितलं जात आहे.