Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Special Train: भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन ' या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत उद्या म्हणजे सोमवारी 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. ते या पहिल्या ट्रेनला सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हिरवा झेंडा दाखवतील. या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घेता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. यातून पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती मिळणार आहे. ही केवळ एक यात्रा नसून आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.
सहल तपशील
- सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किटशुभारंभ
- दिनांक: 09 जून 202
- 5कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
- प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT),
- मुंबईप्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे
यात्रेचा प्रवासमार्ग
- मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.