Mumbai News: मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

135 वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 500 चौरस फुटांचे घर केवळ 25.50 लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा - Raj Thackeray: 'मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्विकारतो!', राज ठाकरेंनी कार्यकर्त्याचीच घेतली फिरकी, पाहा Video

यावेळी फडणवीस म्हणाले, 135 वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन' चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवास, डबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनी, वारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

Advertisement

नक्की वाचा - Nashik News: घरांना हादरे बसले, काचा फुटल्या; नाशिककरांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे त्रिपाठी यांचे, तसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. डबेवाल्यांच्या कार्याचा गौरव करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विठ्ठलाचे नाव घेत लोकांच्या पोटापाण्याची सेवा करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहणे हा मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. हे केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे केंद्र ठरुन मुंबईची ओळख द्विगुणित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement