राहुल कांबळे
सिडकोने 4508 घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना जाहीर केली आहे. त्यासाठी 22 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरूवात ही झाली आहे. मात्र ऑनलाईन अर्ज दाखल करताना ऐरर येत आहे. एका पेक्षा जास्त वेळ ट्राय करून ही अर्ज दाखल होत नव्हता. त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास ही सहन करावा लागला. काहींनी अर्ज भरण्याचे ही टाळले. असं असलं तरी पहिल्या दोन दिवसात अनेकांनी अर्ज भरले असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. एकाच वेळी अनेक जण अर्ज भरायला येत असल्याने एरर येत असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रीया आता सुरळीत होईल असं ही सांगितलं जात आहे. अर्ज भरण्यास अडचण येणार नाही असं सिडको तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
“सिडको गृहसंकुलांतील 4,508 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 22 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आला. योजनेचा प्रारंभ झाल्यापासून केवळ पहिल्या दोनच दिवसांत तब्बल 7,555 अर्जदारांनी सदर गृहनिर्माण योजनेकरिता स्वारस्य दाखवले आहे अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. आतापर्यंत 7,555 अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू करून कागदपत्रे सादर करण्यास सुरूवात केली आहे असं ही त्या म्हणाल्या. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सिडकोतर्फे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे असं ही त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की सिडकोच्या या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पुढील काही दिवसांत अर्जदारांची संख्या वाढतच जाणार आहे अशी सिडकोला खात्री आहे. अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून, पात्र अर्जदारांची योजनेकरिता अंतिम नोंदणी करण्यात येईल. याद्वारे सिडकोच्या गृहनिर्माण योजनांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे यात काहीच शंका नाही. असं ही प्रिया रातांबे यांनी स्पष्ट केलं.
सिडकोने जाहीर केलेली योजना ही EWS आणि LIG गटासाठी आहे. ज्यांचे उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे त्यांना EWS च्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांचे उत्पन्न हे 6 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना LIG त्या घरांसाठी अर्ज करता येईल. ही घरं तळोजा, द्रोणागिरी, खारघर,घणसोली आणि कळंबोली भागात आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार ही घरं दिली जाणार आहे. यासाठी सिडकोने दिलेल्या https://cidcofcfs.cidcoindia.com या वेबसाईटवर अर्ज दाखल करायचा आहे.