सिडकोने गेल्या वर्षी 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' ही योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत घरांची लॉटरीही काढण्यात आली. जवळपास 26 हजार जणांना हे घर लॉटरीमध्ये मिळाले होते. तोपर्यंत घराच्या किंमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. लॉटरीनंतर या घरांच्या किंमती जाहीर करण्यात आल्या. मात्र सर्व सामान्यांसाठी असलेल्या या घराच्या किंमती मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर होत्या. त्या दिवसापासून या किंमती कमी कराव्यात याची मागणी लॉटरीतील विजेते मागणी करत आहेत. मात्र आश्वासना पलिकडे त्यांच्या पदरात काही पडले नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत आले असता त्यांच्या समोरच या लॉटरी विजेत्यांनी निदर्शने करत आपली मागणी लावून धरली.
मनसेचे नवी मुंबई प्रमुख गजनन काळे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात सिडको सोडतधारकांनी आंदोलन केल्याचा व्हिडीओ आहे. आंदोलनकर्त्यांच्या हातात बॅनर्स आहेत. त्या ते देवा भाऊ किंमती कमी करा, आम्हाला न्याय द्या. आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी करताना दिसत आहे. त्याच वेळी पोलीस त्यांना सुरक्षेच्या कारणाने शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी या लॉटरीधारक घोषणाबाजी करत असताना या व्हिडीओत दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लक्ष वेधण्यात हे लॉटरीधारक यशस्वी झाले.
ज्यावेळी मुख्यमंत्री भाषणाला उभे राहीले त्यावेळी त्यांनी आवर्जून सिडकोच्या घराचा उल्लेख केला. त्यांना आंदोलन करणाऱ्या सिडको लॉटरीधारकांना आश्वासन दिले. येत्या पंधरा दिवसात सिडकोच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सिडकोच्या घरांचा प्रश्न हा महत्वाचा आहे असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे याघरांच्या किंमती कमी होण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराच्या किंमती कमी करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार बैठक घेण्यात येईल असं ही सांगण्यात आलं. पण आश्वासना पलिकडे काही मिळालं नाही.
घराच्या किंमती कमी करण्यासाठी नाही बैठक झाली नाही पुढे काही हालचाली झाल्या. त्यामुळे ज्यांना घर मिळाले आहे ते हवालदिल झाले आहेत. जर लवकर निर्णय झाला नाही तर लागलेले घर हातातून जाण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यावर आता पुढच्या पंधरा दिवसात तरी निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की पुन्हा एकदा सिडको लॉटरी विजेत्यांना आंदोलनाची भूमीका घ्यावी लागते हे पाहावे लागेल.