Badlapur News : बिहारमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीला कॅन्सरचं निदान झालं होतं. तिला मुंबईत उपचारांसाठी यायचं असल्यानं जवळच्याच गावात राहणाऱ्या एका 27 वर्षीय नराधमानं तिला आधार देत बदलापूरमध्ये भाड्याने घर घेऊन दिलं. पण अखेर त्याच्यातला नराधम जागा झाला अन् त्याने 13 वर्षांच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं. मात्र उपचारांदरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं, अन् या नराधमाचं बिंग फुटलं. यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिहारमधल्या या मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर उपचारांसाठी मुंबईला येण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला. हीच संधी साधत जवळच्या गावात राहणाऱ्या सुरज सिंग या नराधमानं तिच्यासह तिच्या कुटुंबियांना बदलापूरमध्ये आणत एक घर भाड्याने घेऊन दिलं. या घरी त्याचंही कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्यानं नियमित येणं-जाणं होतं.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
याच दरम्यान संधी साधत त्यानं तीन ते चार वेळा या कॅन्सर पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. ही बाब तिच्या उपचारात उघड झाली. यानंतर मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत झिरो नंबरचा एफआयआर दाखल होऊन तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ट्रान्सफर झाला. मात्र या गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या.
(नक्की वाचा- कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; एका चुकीमुळे आरोपीचं बिंग फुटलं)
पण हा बनाव सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी ओळखला आणि पीडितेच्या कुटुंबाची कसून चौकशी केली. अखेर त्यात त्यांनी सत्य सांगितलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नराधम आरोपी सुरज सिंग याला बिहारमधून बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.आरोपी सुरज सिंग याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.