शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबर पूर्ण होत आहे. तिला आता महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 1 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या महिनाभरात सहायक स्तरावरून सर्व उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, महसूल विभागाने खरीप हंगाम 2025 मधील पीक पाहणी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज निर्देश दिले आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबर 2025 रोजी संपत आहे. आगामी एका महिन्यात 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 राहिलेल्या प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सहायकांमार्फत पूर्ण करायची आहे.
नक्की वाचा - Pune News: एम. कॉम शिकलेला निलेश घायवाळ कसा बनला कुख्यात गुंड? कशी मिळवली एवढी संपत्ती?
जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले की, सर्व सहायक प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करत आहेत. याचा दैनंदिन आढावा घ्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. बहुतांश वेळा गावापासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक राहिलेली असते. शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सदर पाहणी सहायकामार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे. सहायकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे अनिवार्य आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणीची नोंद 7/12 उताऱ्यावर प्रसिद्ध होते. त्यामुळे 100 टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.