Cyclone Shakti Live Tracker: अरबी समुद्रात निर्माण झालेले 'शक्ती' (Shakhti) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर 'तीव्र चक्रीवादळी वादळ' (Severe Cyclonic Storm) मध्ये झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात असल्याने भूस्खलनाचा (Landfall) धोका नाही, मात्र किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि समुद्रात रौद्र स्थिती कायम राहील. हे वादळ आणखी किती दिवस राहणार? तसंच त्याची सध्याची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
शक्ती चक्रीवादळाची सद्यस्थिती (Cyclone Shakti: Latest Update)
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, ईशान्य अरबी समुद्रावरील 'शक्ती' (Shakhti) चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये (शनिवार 4 ऑक्टोबर सकाळी 11.30 पर्यंत) वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे त्याची तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळी वादळ बनले आहे.
हे वादळ शनिवारी ( 4 ऑक्टोबर) सकाळी 8.30 वाजता वायव्य (Northwest) आणि ईशान्य (Northeast) अरबी समुद्रावर 22.0N अक्षांश आणि 64.5E रेखांशाजवळ केंद्रित होते.
हे वादळ पश्चिम-नैर्ऋत्येकडे सरकून रविवारपर्यंत (5 ऑक्टोबर) वायव्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात पोहोचेल. सोमवारी सकाळपासून (6 ऑक्टोबर) ते पुन्हा वळून पूर्व-ईशान्य दिशेने जाईल आणि हळूहळू कमकुवत होईल. मंगळवारी (7 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन ते खोल दाब क्षेत्रात (Deep Depression) रूपांतरित होईल.
'शक्ती' नावाचा अर्थ काय?
'शक्ती' या नावाचा अर्थ तमिळ भाषेत 'सामर्थ्य' (Power) असा आहे. 2004 मध्ये जागतिक हवामान संघटनेने (WMO) निश्चित केलेल्या नामकरण प्रणालीनुसार हे नाव श्रीलंका देशाने सुचवले होते.