IMD Cyclone Shakti Update: अरबी समुद्रातील पहिले चक्रीवादळ 'शक्ती' अधिक तीव्र होत असून ते गुजरातच्या किनाऱ्याकडे (Dwarka) सरकत आहे. या वादळाचा मुंबई आणि महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होईल, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. सध्याच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर राहील आणि त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा थेट धोका नाही.
काय आहे शक्ती चक्रीवादळ?
शक्ती' (Shakhti) हे मान्सूननंतरच्या हंगामातील अरबी समुद्रातील पहिले चक्रीवादळ आहे. शुक्रवारी (3 ऑक्टोबर) रात्री 8:30 वाजता (IST) हे चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रावर, द्वारकापासून सुमारे 300 km पश्चिमेस, पाकिस्तानमधील कराचीपासून 330 km दक्षिण-नैऋत्येस आणि पोरबंदरपासून 360 km पश्चिमेस केंद्रित होते. ते गेल्या 6 तासांमध्ये 8 kmph च्या वेगाने पश्चिम-वायव्येकडे सरकले.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन 'तीव्र चक्रीवादळ' (Severe Cyclonic Storm) मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पश्चिम-नैऋत्येकडे पुढे सरकून रविवारपर्यंत (5 ऑक्टोबर) उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, सोमवारी (Monday) सकाळपासून या वादळाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
( Cyclone Shakti Live Tracker: 'शक्ती' चक्रीवादळ कुठे आहे? इथे चेक करा लाईव्ह अपडेट, हवामान विभागाची ताजी माहिती )
मुंबई आणि महाराष्ट्रात काय होणार?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे Twitter) वर मुंबई आणि महाराष्ट्राला चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी, हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी हवामानाचे अपडेट देणारे ऋषिकेश आग्रे यांनी 'X' वरील एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे 'शक्ती' चक्रीवादळामुळे मुंबई आणि महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा कोणताही धोका नाही. अनावश्यक भीती आणि अफवा पसरत आहेत. कृपया केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून रहा.
समुद्रातील स्थिती आणि मासेमारांना इशारा
या वादळामुळे देशातील कोणत्या भागावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी असली तरी, समुद्रातील स्थिती मात्र धोकादायक बनली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच पाकिस्तान किनारपट्टीवर समुद्राची स्थिती 'खूप खवळलेली' (Very Rough to Rough) राहण्याची शक्यता आहे. हा परिणाम रविवारपर्यंत कायम राहील.
त्यामुळे, मासेमारांनी मंगळवारपर्यंत वायव्य अरबी समुद्र, ईशान्य अरबी समुद्राला लागून असलेले भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच त्यालगतच्या समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.