धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी निगडीत एक मोठी बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूहाच्या संयुक्त उपक्रमाने, धारावीच्या बाहेरील महत्त्वाच्या पुनर्वसन स्थळांपैकी एक असलेल्या जागेसाठी पर्यावरण मंजुरी मिळवण्याच्या दिशेने पहिले औपचारिक पाऊल उचलले आहे. ही जागा अक्सा-मालवणी येथे असून याचे क्षेत्रफळ 140 एकर इतके आहे. नवभारत मेगा डेव्हलपर्स या स्पेशल पर्पज व्हेईकलने पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे (MoEF&CC) संदर्भाच्या अटी (Terms of Reference – ToR) दाखल केल्या आहेत. कोणतेही बांधकाम होण्यापूर्वी तपशीलवार पर्यावरणीय तपासणीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 11 ऑक्टोबर 2024 च्या राजपत्रित अधिसूचनेवर आधारित हे फायलिंग, प्रकल्पासाठी प्रस्तावित 140 एकर जमिनीच्या वाटपासंदर्भातील महत्त्वाची माहिती देते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या या जमिनीवर धारावीमध्ये जागेवरच घरे मिळण्यास पात्र नसलेल्या रहिवाशांना पुनर्वसित केले जाण्याची अपेक्षा आहे.
( नक्की वाचा:धारावीमध्ये अपात्र वाणिज्यिकांना मिळणार व्यवसायाची संधी )
पर्यावरण पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू होणार
तज्ज्ञांच्या मते, ही घडामोड म्हणजे, बांधकामासाठी मिळालेली प्रत्यक्ष परवानगी नाही, परंतु यामुळे पर्यावरण पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू होते. ही एक प्रारंभिक पायरी आहे. म्हणजेच, ही डिझाइन किंवा जमीन-वापराची थेट मान्यता नाही, पण पुढील मंजुरी देण्यापूर्वी संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी CRZ, नागरी विमान वाहतूक आणि राज्य पर्यावरण विभाग यांसारख्या विविध एजन्सींच्या मूल्यांकनाला यामुळे चालना मिळते.
( नक्की वाचा: धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांचा सूर बदलला, पुनर्विकासाबाबत सरकारकडे मोठी मागणी )
पायाभूत सुविधांचा विकास होणार
पर्यावरण मंजुरी मिळवण्यासाठी टीओआर सबमिशन ही पहिली औपचारिक पायरी आहे. या प्रक्रियेला साधारणतः 6 ते 7 महिने लागतात. यामध्ये बांधकामाचे क्षेत्र, हिरवीगार जागा, रहदारीचे नियोजन आणि पर्यावरणीय सुरक्षा यांसारख्या प्रकल्प तपशिलांची माहिती दिली जाते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही जागा सर्व पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर धारावी प्रकल्पासाठी इतर सर्व वाटप केलेल्या जमिनींप्रमाणेच संपूर्ण पायाभूत सुविधांसह विकसित केली जाईल. या जमिनींमध्ये पुनर्वसन केलेले रहिवासी नेहमीच त्याच्या परिसंस्थेशी जोडलेले राहतील. एकदा टीओआर मंजूर झाल्यानंतर, संपूर्ण पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन केले जाईल. लाखो धारावी कुटुंबे अजूनही त्यांच्या स्वतःच्या घराची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हे केवळ कागदोपत्री काम नाही, तर एका सन्माननीय जीवनासाठी खऱ्या बदलाची ही सुरुवात आहे.