Dombivli MIDC Blast स्फोटानं हादरलं साईबाबा मंदिर, साखरपुड्यात पळापळ, Video

Dombivli MIDC Blast डोंबिवलीतल्या ज्या कंपनीत हा ब्लास्ट झाला त्याची झळ शेजारच्या साईबाबा मंदिराला देखील बसली.

Advertisement
Read Time: 2 mins
साईबाबा मंदिराच्या परिसरात साखरपुडा होता. स्फोटानंतर सर्वांची पळापळ झाली.
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

 MIDC मधील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानं डोंबिवली शहर हादरलंय. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले आहेत. मृतामंध्ये दोन महिलांचा समावेश आहे. डोंबिवलीच्या अमुदान कंपनीत हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील इमारतींचं देखील मोठं नुकसान झालं. या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. MIDC परिसरासह जवळपासच्या भागात स्फोटानंतर कंपने जाणवली. आगीचे मोठे लोट दिसत होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

( Video : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 34 जखमी )

डोंबिवलीतल्या ज्या कंपनीत हा ब्लास्ट झाला त्याची झळ शेजारच्या साईबाबा मंदिराला देखील बसली. मंदिराच्या काचा या स्फोटानं फुटल्या. त्याचबरोबर पीओपी उखडले. या मंदिराच्या परिसरात साखरपुडा होणार होता. स्फोटाचा आवाज ऐकताच तेथील लोकांनी पळ काढला. सर्व खुर्च्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. 

डोंबिवलीमधील या स्फोटात 34 जण जखमी झाले आहेत. त्यामधील 20 जणांना डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये, 9 जणांना नेपच्यून हॉस्पिटलमध्ये, शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये 2 जणांना दाखल करण्यात आलंय.  ओमेगा, अमुदान , हुंडाई सर्व्हिस सेंटर, अंबर केमिकल, सोहम इंजिनियरिंगच्या बाजूचा परिसर या स्फोटानंतर आगीच्या विळख्यात आला. या भागातील वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या कंपन्याचे प्रवेशद्वार अडचणीचे असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत. परिसरातील रस्त्यांवर काचाचा खच साचला होता.

डोंबिवलीच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे. या स्फोटानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंबिवली MIDC मधील कंपन्यांच्या सुरक्षेबाबत यापूर्वी देखील वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. डोंबिवलीत 2016 साली देखील याच पद्धतीनं केमिकल कंपनीत स्फोट झाला होता. त्या स्फोटानंतरही मोठी जीवितहानी तसंच आर्थिक नुकसान झालं याकडं या नागरिकांनी लक्ष वेधलं.

Advertisement