Dombivli News: डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या मुजोरीचा नवा प्रकार समोर आलाय. स्टेशनजवळ एकाच ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढलेली असताना रिक्षाचालकांच्या अजब अटी आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. स्टेशन परिसरातून स्टार कॉलनी येथे जाण्यासाठी नागरिक रिक्षेची वाट पाहत उभे असताना अनेक रिक्षाचालकांनी थेट भाडे नाकारले. विशेष म्हणजे स्टार कॉलनीला जायचे असल्यास शनी मंदिरापर्यंतचे पूर्ण भाडे द्यावे लागेल, अशी अटच काही रिक्षाचालकांनी प्रवाशांसमोर ठेवली. यामुळे दीड ते दोन तास नागरिक रस्त्यावर ताटकळत उभे होते, तरीही रिक्षाचालक त्यांना घेऊन जाण्यास तयार नव्हते.
काय आहे प्रकरण?
रिक्षाचालकांच्या या मुजोरीची माहिती मिळताच भाजपच्या महिला पदाधिकारी मनीषा राणे तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी संतप्त प्रवाशांना सोबत घेऊन रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान त्यांनी भाडे नाकारणाऱ्या काही रिक्षांच्या चाव्याच थेट ताब्यात घेतल्या.
या अचानक झालेल्या आंदोलनामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई; एक्स-रे काढताच आई-वडील हादरले )
प्रशासनाचं उत्तर काय?
या संपूर्ण घटनेबाबत कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे अशा प्रकारांवर तत्काळ कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्टीकरण आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे स्टेशन परिसरात सुमारे 1 ते 1.5 तास गोंधळाचे वातावरण कायम होते.
( नक्की वाचा : Akola News: अकोला शिक्षक बदली घोटाळ्यात मोठा धमाका! 33 शिक्षक तडकाफडकी निलंबित,वाचा सविस्तर )
रोजच्या या मनस्तापाला कंटाळलेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी भाडे नाकारणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओ आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.