अमजद खान
KDMC चे शास्त्रीनगर हॉस्पीटल हे नेहमीच चर्चेत असते. कल्याण डोंबिवली महापालिकेचे हे हॉस्पिटल आहे. डोंबिवलीत हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात पुन्हा एकदा रुग्णाच्या नातेवाईकांचा गोंधळ समोर आला आहे. एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी स्थानिक नागरिक त्याला घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयात आले. डॉक्टरांनी तरुणाला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका ही आली. मात्र रुग्णवाहिकेत तरुणाचे नातेवाईक बसले. खरे तर रुग्णवाहीका ही रुग्णासाठी असते. त्यात एकाद दुसरा नातेवाईक बसला तर चालतो. पण तसे झाले नाही. त्यानंतर खरा राडा सुरू झाला. त्याचा परिणाम असा झाली की रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
यावेळी रुग्णवाहीकेत बसलेल्या तरुणाच्या नातेवाईकांना महिला डॉक्टरने मी नर्स आणि पोलिस घेऊन येते असे सांगितले. त्यानंतर ती डॉक्टर महिला रुग्णवाहिकेतून बाहेर आली. हे पाहताच रुग्णाचे नातेवाईकांनी गेांधळ करण्यास सुरुवात केली. तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांना आरेरावी केली. त्यात इतका गोंधळ केला की महिला डॉक्टरला एका रुममध्ये स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता रुग्णांच्या नातेवाईकांचे वर्तन ही चर्चेचा विषय ठरला आहे.
डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहणारा मोहम्मद हुसेने पावटे या 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्याला पाहिल्याने त्याला कसेबसे खाली उतरवण्यात आले. पुढे त्याला शेजारी आणि नातेवाईकांनी मिळून उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सायन येथे पाठविले. त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका ही बोलावण्यात आली. रुग्णासोबत त्याचे नातेवाईक रुग्णवाहिकेत बसले. रुग्णवाहिकेत जास्त लोक असल्याने महिला डॉक्टरने त्यावर आक्षेप घेतला.
त्यांनी मी नर्स आणि पोलिसांना घेऊन येते. हे ऐकताच संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकासह नागरीकांनी गोंधळ सुरु केला. गोंधळ पाहून महिला डॉक्टरवर स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ आली. सुरक्षा रक्षकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबतही नातेवाईक आणि नागरीकांनी आरेरावी केली. रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. परंतू डॉक्टरची मानसिकता देखील समजणे महत्वाचे आहे. डॉक्टरने सोबत जाण्यास नकार दिला नव्हता असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या घटनेच्या व्हिडिओत नातेवाईक आणि नागरीक गोंधळ करुन रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफ सोबतआरेरावी करीत शिवीगाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.