Dombivli News: राज्यभरात तीव्र संताप निर्माण करणाऱ्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणाला आता एक मोठे वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. कल्याण न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर केला असून कोर्टात दोन्ही बाजूंमध्ये झालेला जोरदार युक्तिवाद आणि न्यायालयाने घेतलेला निर्णय आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत कायदेशीर पातळीवर नक्की काय घडले, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कल्याण कोर्टात नेमकं काय झालं?
शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या आरोपाखाली शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह प्रमोद निगम, अक्षय करांडे आणि रमेश पवार यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना यापूर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर उर्वरित 3 आरोपींच्या जामीन अर्जावर कल्याण न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.
या सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि पोलिसांनी आरोपींच्या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना जामीन देऊ नये, ते बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकतात किंवा त्यांना त्रास देऊ शकतात, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )
बचाव पक्षाचा तो युक्तिवाद ठरला प्रभावी
दुसरीकडे, आरोपींचे वकील ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे समानतेच्या तत्त्वावर इतर 3 समर्थकांनाही जामीन मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे आरोपी बाहेर आल्यानंतर साक्षीदारांना कोणताही त्रास देणार नाहीत किंवा तपासात अडथळा आणणार नाहीत, अशी हमीही बचाव पक्षाने न्यायालयाला दिली.
न्यायालयाने का दिला जामीन?
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि मुख्य आरोपीला आधीच जामीन मिळाल्याची बाब विचारात घेऊन कल्याण न्यायालयाने उर्वरित 3 आरोपींचा जामीन मंजूर केला. न्यायालयाने प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर (बॉंड) या तिघांची सुटका करण्याचे आदेश दिले. यामुळे आता या प्रकरणातील सर्वच्या सर्व 4 आरोपी तुरुंगाबाहेर आले आहेत.
( नक्की वाचा : Dombivli News: डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! रमेश म्हात्रेचा जामीन मंजूर कसा झाला? वाचा Inside Story )
डोंबिवलीकरांना काय वाटते?
वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यानंतर आरोपींना तुलनेने लवकर जामीन मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, जामीन मिळणे म्हणजे आरोपी निर्दोष सुटले असा होत नाही. पोलिसांचा तपास आणि न्यायालयातील अंतिम सुनावणी दरम्यान सादर होणाऱ्या पुराव्यांवरच या हायप्रोफाईल प्रकरणाचा अंतिम निकाल अवलंबून असणार आहे.