Dombivli News: डोंबिवलीकरांनो, आता ठाण्याला जाण्यासाठी ट्रेनची कटकट संपली! पाहा कधीपासून सुरू होतेय बस

Dombivli News: डोंबिवलीकरांचा प्रवास आता अधिक सुखाचा होणार आहे. डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli News: डोंबिवलीतून ठाण्याला जाणाऱ्या सर्वांसाठी हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरणार आहे.
डोंबिवली:

Dombivli News: डोंबिवलीकरांचा प्रवास आता अधिक सुखाचा होणार आहे. डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने डोंबिवली ते ठाणे या मार्गावर विशेष बस सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार बस सेवा

ही नवीन बस सेवा येत्या 4 मार्च 2026 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. डोंबिवलीतील मोठागाव सर्कल ते ठाणे येथील माजिवडा जंक्शन या दरम्यान ही बस धावणार आहे.

डोंबिवलीतून ठाण्याला जाणाऱ्या सर्वांसाठी हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरणार आहे. विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी लोकलमध्ये होणारी जीवघेणी गर्दी टाळण्यासाठी या बस सेवेचा मोठा फायदा होणार आहे. रस्ते मार्गाने थेट ठाण्यापर्यंत प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
 

नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. रस्ते मार्गाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास रेल्वेवरील ताण कमी होईल, हा मुद्दा त्यांनी आग्रहाने मांडला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत प्रशासनाने तातडीने ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डोंबिवलीतील हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News: 15 मिनिटांत ऐरोली आणि थेट तळोजा मेट्रो! कल्याणकरांच्या प्रवासाचा 'कायापालट' करणारा 'मेगा प्लॅन' )

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दिपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच याकामी विशेष सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल डोंबिवलीचे आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. ही बस सेवा केवळ प्रायोगिक तत्त्वावर मर्यादित न राहता, भविष्यात ती नियमित करण्यासाठी आणि बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
 

Topics mentioned in this article