Dombivli News : डोंबिवलीत मतदारांचे 'अस्तित्व' धोक्यात! 4500 मतांच्या 'गोंधळा'मुळे शिवसेना आक्रमक

Dombivli News : डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदार यादीतील मोठ्या गोंधळावरून राजकारण तापले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli News : शिवसेना शिंदे गटाचे (Shinde Sena) माजी सभापती विकास म्हात्रे यांनी यासंदर्भात थेट निवडणूक आयोगाला (Election Commission) इशारा दिला आहे.
डोंबिवली:

Dombivli News : कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) मध्ये महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागताच मतदार याद्यांतील गोंधळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदार यादीतील मोठ्या गोंधळावरून राजकारण तापले आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना शिंदे गटाचे (Shinde Sena) माजी सभापती विकास म्हात्रे यांनी यासंदर्भात थेट निवडणूक आयोगाला (Election Commission) इशारा दिला आहे. संविधानाने (Constitution) दिलेला मतदानाचा हक्क (Right to Vote) मतदारांकडून हिरावला जात असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरू आणि न्यायालयातही जाऊ, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

म्हात्रे यांनी गंभीर आरोप केला आहे की, प्रभाग 22 मधील तब्बल 4,500 मतदारांची नावे जाणूनबुजून इतर प्रभागांमध्ये हलवण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की, सीमावर्ती भागातील (Border Area) नावे हलली असती, तर आम्ही ते मान्य केले असते. परंतु, प्रभागाच्या मध्यभागातील मतदारांची नावेच दुसरीकडे कशी गेली? यात नक्कीच काहीतरी घोळ आहे, असा दावा त्यांनी केला.

( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवली हादरली! पलवा सिटीजवळ सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितलं? )
 

निवडणूक आयोगाने या चुका त्वरित दुरुस्त केल्या नाहीत, तर यामागे कोणती अदृश्य शक्ती (Invisible Power) आहे, ती आम्ही शोधून काढू, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रभागात जाऊन पुन्हा सर्व्हे (Survey) करावा आणि याद्यांतील चुका त्वरित दुरुस्त करून निष्पक्ष निवडणुकीसाठी (Fair Election) मतदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मतदार यादीतील हा घोळ दुरुस्त न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयीन लढाही (Legal Battle) दिला जाईल, असा निर्वाणीचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

Advertisement

या घोळामुळे डोंबिवलीतील प्रभाग 22 मधील मतदारांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण (Confusion) निर्माण झाले आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.