Baba Adhav Death News: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (बाबा आढाव) यांचे आज (सोमवार, 8 डिसेंबर) निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी आणि वंचित समाजासाठी लढणारा एक निःस्वार्थ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
बाबा आढाव यांचे सामाजिक कार्य
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि आयुष्यभर कष्टकरी वर्गासाठी समर्पित राहिलेले नेतृत्व होते. असंघटित आणि वंचित घटक, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजूर, यांना न्याय, सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांचे कार्य केवळ चळवळीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी माणुसकी आणि समतेचे मोल जपले.
त्यांच्या कार्याचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हमाल पंचायती'ची स्थापना. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो हमालांना संघटित केले आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण केले. तसेच, समाजात खोलवर रुजलेल्या जातीय भेदभावाविरुद्ध त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Pune News : पुणे मेट्रो लाईन 4 ची प्रतीक्षा समाप्त! आता 'या' चार प्रमुख भागांना मिळणार थेट कनेक्टिव्हिटी )
डॉ. बाबा आढाव यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये पुण्यभूषण पुरस्कार* (2006), 'द वीक' (The Week) मासिकाने दिलेला 'मॅन ऑफ द इयर' सन्मान (2007) आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार (2011) यांचा समावेश आहे. त्यांनी 'एक गाव, एक पाणवठा', 'सत्यशोधनाची वाटचाल' आणि 'हमाल पंचायत' यांसारख्या पुस्तकांचे लेखन करून आपले विचार जनमानसांपर्यंत पोहोचवले.
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनामुळे सामाजिक आणि कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.