स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापक यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत या दोघांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. जर या दोघांपैकी कोणी दोषी आढळले तर त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे आदेश देण्यात आले आहे. गुरुवारी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली असून यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित बसस्थानकावरील त्या वेळी कामावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची विभागीय चौकशी करावी आणि त्यात ते दोष आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. या बसस्थानकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील 7 दिवसां आपल्यापुढे सादर करावा असे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत.
नक्की वाचा : शेकडो कंडोम्स, साड्या अन् बेटशीट.. पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील भयानक दृश्य
सध्या " महिला सन्मान योजने " अंतर्गत महिलांना तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट बसस्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बैठक बोलावली आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.