Friendship Day 2026: फ्रेंडशिप डे रविवारी साजरा केला जात आहे. अनेक मित्र मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छाही देत आहेत. पण खऱ्या मैत्रीची व्याख्या काय? तर त्याचे उत्तर वेगवेगळे असेल. कोणी रक्ताच्या नात्याचे मित्र असतात, तर कुणी सुखा दुखात साथ देणार मित्र असतात. पण या पलिकडचे ही एक मैत्रिचं नातं आहे. ते म्हणजे माणूसकीचे नाते. हे नातं जपायला आणि जोडायला माणसं ही तशीच लागतात. नागपूरच्या अशाच एका डॉक्टर दाम्पत्याने हे नातं जपलं आहे. त्यांच्या या नात्यामुळे एका व्यक्तीला जिवनदान मिळालं आहे. त्यामुळे मैत्रीचं हे नातं इतर मैत्री पेक्षा नक्कीच वेगळं आहे. मैत्री दिनानिमित्त या खास नात्याची चर्चा नागपूरात होत आहे.
डॉ. किशोर मौहरील आणि डॉ. लता मौहरील हे नागपूरचे रहिवाशी आहे. त्यांनी आपल्या ओळखीच्या रुग्णाची अशी काही मदत केली की ती कधी ही विसरता येणार नाही. त्यांनी एका गरजवंत महिलेला आपली किडणी दान केली आहे. किडनी दान करून त्यांनी मानवतेची मैत्री जपली आहे. नेहा पांडे या 2014 पासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. त्याचं वय 44 वर्ष आहे. त्यांची किडनी निकामी होणार होती. जणू आता आयुष्य थांबणार अशी स्थिती त्यांच्या समोर होती. अशा वेळी डॉक्टर किशोर हे पुढे आले. त्यांनी आपली एक किडनी नेहा यांना दिली.
थांबणारं आयुष्य एका क्षणात पटरीवर आलं. नेहा या ठणठणीत झाल्या. केवळ मानवतेच्या उद्देशाने त्यांनी आपली किडनी दिली.नेहा पांडे यांच्यासोबत डॉक्टर दाम्पत्याचं कोणचं ही रक्ताचं नात नाही. पण त्यांच्या या एका कृतीने हे नातं रक्ताच्या पलिकडचं होवून बसलं. ते नात ते आज ही जपत आहेत. हीच खरी मैत्री असं ही ते या निमित्ताने आवर्जून सांगतात. नागपूरात या अनोख्या नात्याची चांगलीच चर्चा आहे. डॉक्टर मौहरील यांनी इतरांसमोर एक उदाहरण या निमित्ताने ठेवले आहे. मैत्री अशी ही होवू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण मानवतेचे नाते निर्माण करणं हे आल्या हातात असतं. डॉ. मोहरील दाम्पत्याने स्वताची किडनी देवून एक अनोळखी व्यक्ती सोबत आपली नाळ जोडली आहे. ही नाळ मैत्रीची नाळ आहे. ही मैत्री खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप डेसाठी अर्थ पूर्ण म्हणावी लागेल. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात पती-पत्नी दोघांनीही जिवंत असताना, कोणत्याही नातेसंबंधाचा विचार न करता अशा प्रकारे पूर्णपणे अनोळखी व्यक्तीत अवयवदान करण्याचे हे अत्यंत दुर्मीळ म्हणावे लागेल.