मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या 7 तलावांपैकी विहार आणि मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरून ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव मध्यरात्री तर मोडक सागर तलाव सकाळी ओसंडून वाहू लागला आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. तलाव परिसरात सध्या जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे हे तलाव भरण्यास मदत झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी गेल्याच आठवड्यात तुळशी आणि तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागले आहेत. त्या पाठोपाठ आज एकाच दिवशी आणखी दोन तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. ही मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बाब आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 2,769.8 कोटी लीटर एवढी आहे.तर मोडक सागर तलावाची एकूण जलधारण क्षमता ही 12892.5 कोटी लीटर इतकी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर इतकी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव भरत असल्याने मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.