Goregaon Mulund Link Road : गोरेगाव ते मुलुंड आता काही मिनिटांत; मुंबईतील सर्वात मोठ्या बोगद्याचे वाचा अपडेट

Goregaon Mulund Link Road : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि पूर्व उपनगरातील मुलुंड यांमधील तासनतास चालणारा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Goregaon Mulund Link Road : या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर तर होईलच, पण इंधन आणि वेळेचीही मोठी बचत होणार आहे.

Goregaon Mulund Link Road : मुंबईकरांच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न आता लवकरच वास्तवात येणार आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि पूर्व उपनगरातील मुलुंड यांमधील तासनतास चालणारा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाचे काम आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, लवकरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदा खोदण्याचे काम सुरू होणार आहे. या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर तर होईलच, पण इंधन आणि वेळेचीही मोठी बचत होणार आहे.

काय होणार फायदा?

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या या दोन उपनगरांदरम्यान प्रवास करण्यासाठी जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता (जेव्हीएलआर) हा एकमेव प्रमुख पर्याय आहे. 

मात्र, नव्या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर तब्बल 8.80 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळणार आहे. वेळेची बचत होण्यासोबतच वाहनांच्या इंधनाचा खर्च कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनात घट झाल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होणार आहे.

( नक्की वाचा : Pune News: खंबाटकी घाटाची झंझटच संपली, 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 7 मिनिटांत ! वाचा सर्व माहिती )
 

या प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात 5.3 किलोमीटर लांबीच्या तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या बोगद्यासाठी आवश्यक असलेल्या लॉन्चिंग शाफ्टचे खोदकाम सध्या वेगाने सुरू आहे. 

Advertisement

हा शाफ्ट साधारणपणे 200 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल आहे. आतापर्यंत 23 मीटर खोलीपर्यंतचे खोदकाम पूर्ण झाले असून उर्वरित 7 मीटरचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज साधारण 1400 ते 1500 क्युबिक मीटर दगड आणि माती 120 वाहनांद्वारे बाहेर काढली जात आहे.

( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
---

कधी सुरु होणार खोदकाम?

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे (टीबीएम) वापरली जाणार आहेत. यापैकी एका यंत्राचे सर्व भाग उपलब्ध झाले असून, दुसऱ्या यंत्राचे उर्वरित भाग 22 जानेवारी 2026 रोजी रात्रीपर्यंत कामाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. 10 मार्च 2026 पर्यंत ही अवाढव्य यंत्रे शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर जून 2026 पासून प्रत्यक्ष बोगदा खोदकामाला सुरुवात करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

Advertisement

अभियांत्रिकीचे मोठे आव्हान

हा प्रकल्प अभियांत्रिकी दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे. बोगदा खनन संयंत्रांच्या मदतीने 5.3 किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे तयार केले जातील. पेटी बोगद्यासह हे एकूण अंतर साधारण 6.62 किलोमीटर असेल. 

प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास 14.42 मीटर इतका प्रचंड असून त्यामध्ये तीन मार्गिका असतील. कामाचा दर्जा आणि वेग कायम राखत निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे, जेणेकरून मुंबईकरांना लवकरात लवकर या आधुनिक मार्गाचा वापर करता येईल.
 

Advertisement