महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या 786 उमेदवारांचे म्हणणे 25 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत ऐकून घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी सुनावणीसाठी आपल्याला दिलेल्या तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे. यात उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. शिवाय त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील 786 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याबाबतचे नियोजन उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस. व परीक्षार्थींच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी या सुनावणीस स्वखर्चाने उपस्थित रहावे. दिलेल्या दिवशी समक्ष हजर न राहिल्यास सदर प्रकरणी उमेदवाराला काही सांगायचे नाही असे गृहीत धरले जाईल. त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. तो निर्णय बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.
सुनावणीच्या वेळी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मधील उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच चालक परवाना, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी उमेदवाराच्यावतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.