हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्या आले आहे. पण महाराष्ट्रात याला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे एक दोन नाही तर जवळपास पाच वेळा या नंबर प्लेट लावण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मात्र पाचवी आणि शेवटची संधी वाहनचालकांसाठी असेल. त्यानंतर मात्र भक्कळ दंड संबंधीत गाडीच्या मालकाला भरावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आपल्या जुन्या गाड्यांवर हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवलेली नाही, त्यांच्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे.
ही डेडलाइन आता थेट 31 डिसेंबर करण्यात आली आहे. मुदतवाढ देण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत राज्यात फक्त 73 लाख गाड्यांवर या प्लेट बसवण्यात आल्या आहेत. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या 2.10 कोटी वाहनांवर ही खास नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे. मात्र, आकडेवारीनुसार, अजूनही जवळपास 65 टक्के म्हणजे कोट्यवधी गाड्यांवर HSRP बसवलेली नाही. एकट्या पुणे शहरातच 15 लाखांहून अधिक गाड्यांवर ही नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे ही आकडेवारी मोठी आहे. अशात आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
या प्लेट्समध्ये खास सिक्युरिटी फीचर्स आणि होलोग्राम असतो. ज्यामुळे तिची नक्कल करणे शक्य नाही. अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये गाडीचा नंबर लगेच ओळखता येतो आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येते. म्हणून सरकारने ही प्लेट बंधनकारक केली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, ही शेवटची संधी आहे. 31 डिसेंबरनंतर HSRP नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. तसेच, दंड भरण्याआधी तुमची आरटीओमधील कोणतीही कामे होणार नाहीत. त्यामुळे त्वरित नोंदणी करा आणि दंड टाळा असं आवाहन आरटीओने केले आहे.
एका नंबर प्लेट तुटल्यास दोन्ही प्लेट्स नव्याने विकत घ्याव्या लागतात. तसेच मोठ्या संख्येने वाहनांना प्लेट्स बसवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने वाहन मालक आणि प्रतिनिधींच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, आता ही अंतिम संधी आहे. 31 डिसेंबरनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंड आकारला जाईल आणि त्यांची आरटीओमधील कामे थांबवली जातील. त्यामुळे वाहनधारकांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी असं वारंवार आवाहन करण्यात आलं आहे.