Mumbai Ahmedabad Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा संपत आली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2027 रोजी तुम्ही या ट्रेनचे तिकीट खरेदी करू शकाल, अशी मोठी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, देशाला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ही मोठी भेट मिळणार आहे. 508 किमी लांबीचा हा प्रकल्प केवळ वेगासाठीच नाही, तर भारतातील रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ओळखला जाईल.
कधी सुरु होणार बुलेट ट्रेन?
रेल्वेमंत्र्यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे आयोजित कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये या ऐतिहासिक मुहूर्ताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल.
यामध्ये सर्वात आधी गुजरातमधील सुरत ते बिलिमोरा हा पट्टा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत आणि पुढे वापी ते अहमदाबाद असे टप्पे पूर्ण केले जातील. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ठाणे ते अहमदाबाद हा टप्पा त्यानंतर सुरू होईल आणि शेवटी मुंबई ते अहमदाबाद हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित होईल.
( नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
वंदे भारतच्या यशानंतर आता बुलेट ट्रेनचे स्वप्न
अश्विनी वैष्णव यांनी यावेळी वंदे भारत एक्सप्रेसच्या यशाचा आवर्जून उल्लेख केला. वंदे भारतमुळे देशातील प्रवाशांमध्ये हाय-स्पीड गाड्यांबाबत एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. या यशानंतर आता रेल्वेकडून वंदे भारत स्लीपर गाड्यांची भेटही दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, कोलकता ते गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन या जानेवारी 2026 महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात जागतिक दर्जाची सुरक्षा आणि सुविधा मिळणार आहेत. देशातील अनेक खासदारांकडून त्यांच्या मतदारसंघात अशा गाड्या सुरू करण्याची मागणी होत असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
कसा आहे बुलेट ट्रेन प्रकल्प?
हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या किती प्रगत आहे आणि त्याचे काम कुठपर्यंत आले आहे, हे समजून घेऊया. या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- या संपूर्ण कॉरिडॉरची एकूण लांबी 508 किमी असून त्यापैकी 352 किमी गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमध्ये, तर 156 किमी महाराष्ट्रात आहे.
- नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) च्या माहितीनुसार, जवळपास 85 टक्के मार्ग (सुमारे 465 किमी) हा उन्नत मार्गावर (Elevated Viaducts) बांधला जात आहे.
- आतापर्यंत 326 किमी लांबीचे उन्नत स्ट्रक्चर पूर्ण झाले असून मार्गावरील 25 नद्यांवरील पुलांपैकी 17 पुलांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.
- सुरत ते बिलिमोरा हा 47 किमीचा भाग सर्वात प्रगत स्थितीत असून तिथे सिव्हिल वर्क आणि ट्रॅक-बेड तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
- संपूर्ण मार्गावर जपानी शिनकानसेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून ही ट्रेन 320 किमी प्रति तास या वेगाने धावू शकेल.