- इंडिगो एअरलाईनच्या प्रमुख शहरांतील विमानतळांवर ४०० पेक्षा अधिक उड्डाणं रद्द झाली.
- विमानतळांवर प्रवासी १२ ते १४ तासांच्या प्रतीक्षेत अडकले असून यात लहान मुलं आणि वृद्ध प्रवासीही होते
- क्रू तुटवड्यामुळे FDTL नियमांमुळे इंडिगोला उड्डाणे रद्द झाली.
Indigo Flight Cancellation: इंडिगो विमान सेवेत मोठे अडथळे निर्माण झाले. त्यामुळे भारतातील प्रमुख शहरे असलेल्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, आणि बेंगळूरु येथील विमानतळांवर इंडिगो एअरलाईनच्या सुमारे 400 हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. तर काही विमानांना विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून विमानतळांवर हजारो प्रवासी, ज्यात लहान मुले आणि वृद्धही होते त्यांचे हाल झाले. 12 ते 14 तास आपल्या फ्लाईटच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत.
कर्मचारी आणि नियमांचा पेच
या संपूर्ण गोंधळासाठी इंडिगो एअरलाईन्सने क्रू (Staff) च्या तुटवड्याचे मुख्य कारण सांगितले आहे. एअरलाईन दररोज 2200 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते. परंतु 2 डिसेंबर रोजी केवळ 35% आणि 3 डिसेंबर रोजी केवळ 20 % उड्डाणे वेळेवर उडू शकली. या संकटामागे FDTL (Flight Duty Time Limitation) नियमांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या आराम मिळावा या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या या नवीन नियमांमुळे कंपनीला क्रू व्यवस्थापनात अडचण येत आहे.
डीजीसीएची कठोर भूमिका
या गंभीर स्थितीची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो व्यवस्थापकांना तत्काळ मुख्यालयात बोलावले आहे. त्यांनी एअरलाईनला उड्डाणे रद्द होण्याची कारणे आणि विलंब कमी करण्यासाठीची योजना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात देखील इंडिगोच्या 1232 उड्डाणे रद्द झाली होती. त्यापैकी 755 क्रू आणि FDTL नियमांमुळे रद्द झाल्या होत्या. या समस्यांमुळे इंडिगोचा 'वेळेवर उड्डाण' (OTP) दर ऑक्टोबरमधील 84.1% वरून नोव्हेंबरमध्ये 67.70% पर्यंत खाली आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाईनने पुढील 48 तासांसाठी काही वेळापत्रकात बदल केले आहेत. प्रभावित प्रवाशांना रिफंड देण्याचे आश्वासन दिले आहे.