रेवती हिंगवे
पुण्यात सध्या अवकळी पाऊसाने सर्वांचीच तारांबळ उडवली आहे. सकाळी कडक उन्ह आणि संध्याकाळी पाऊस अशी स्थिती आहे. बऱ्याच अनपेक्षित गोष्टी पुण्यात होत राहतात. तशीच एक खूप अनपेक्षित गोष्ट पुण्यातील वानवडी परिसरात घडली. एका हिंदू जोडप्याचा लग्न समारंभ चालू होता. त्यात अचानक पावसामुळे व्यत्यय आला. शेजारीच एका मुस्लिम जोडप्याच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. मग काय हिंदू जोडपं या मुस्लिम जोडप्याच्या रिसेप्शनच्या मांडवात आलं. मुस्लिम जोडप्याच्या कुटुंबीयांनी थोडावेळ रिसेप्शन थांबवण्यात आलं. त्यानंतर त्यांनीच हिंदू जोडप्याचं लग्न त्याच ठिकाणी लावून दिलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे यांचा विवाहसोहळा मंगळवारी वानवडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या लॉनवर नियोजित होता. सायंकाळी सातच्या मुहूर्तावर हे दोघे लग्नबंधनात अडकणार होते. मात्र, सायंकाळी पाच वाजता आकाशात मळभ दाटून आले अन् अवघ्या काही क्षणांत मुसळधार पाऊस बरसू लागला. संपूर्ण लॉन जलमय झाल्याने लग्नासाठी केलेल्या सजावटीची दाणादाण उडाली. वधू-वराला उभे राहायलाही जागा उरली नाही. सगळे जण आडोशाला थांबून पाऊस थांबावा, यासाठी देवाचा धावा करत होते.
लॉनच्या शेजारच्या मंगल कार्यालयात मोहसीन काझी आणि माहीन दिलगी या दाम्पत्याच्या स्वागत समारंभ सुरू होता. मोहसीनचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी फारूक काझी हे पाहुण्यांच्या सरबराईत गुंतले होते. कवडे कुटुंबीयांनी त्यांची भेट घेऊन पावसामुळे लग्न खोळंबल्याची व्यथा सांगितली. काझी यांनी मोहसीन-माहीनच्या स्वागताचा कार्यक्रम थांबवून कार्यालयाचा मंच संस्कृती-नरेंद्रच्या लग्नासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. संस्कृती आणि नरेंद्र यांनी चारही कुटुंबीय, त्वऱ्हाडमंडळींच्या साक्षीने एकमेकाला वरमाला घातल्या. त्यानंतर मोहसीन आणि माहीनचा स्वागत सोहळा साजरा झाला.
‘माझ्या एकुलत्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे, हे माझे स्वप्न होते. त्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या. मात्र, पावसामुळे पाणी फेरले गेले, अशा वेळी काझी कुटुंबीयांनी मंच उपलब्ध करून दिला. हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही,' अशी भावना संस्कृतीचे वडील चेतन कवडे यांनी व्यक्त केली. संस्कृती ही आमचीही मुलगी आहे. या भावनेतून आम्ही कार्यक्रम थोडा वेळ थांबवून तिच्या लग्नासाठी मंच उपलब्ध करून दिला. मानवतेचा धर्म सगळ्यात मोठा असतो. अडचणीच्या काळात प्रत्येकाच्या मदतीसाठी उभे राहिले पाहिजे असे फारूक काझी, मोहसीनचे वडील यांनी यावेळी सांगितले. या अनोख्या लग्नाची चर्चा मात्र पुण्यात होत आहे. सर्वांनीच यातून प्रेरणा घ्यावी अशीच ही कहाणी म्हणावी लागेल.