Western Railway New Terminus : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम आता वेगाने सुरू झाले असून जून 2026 मध्ये या टर्मिनसचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. यामुळे मुंबईतील इतर महत्त्वाच्या स्थानकांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
मुंबईकरांना मिळणार चौथे टर्मिनस
याबाबत वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवर सध्या मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि दादर ही महत्त्वाची टर्मिनस आहेत. आता जोगेश्वरी येथे मुंबईतील पश्चिम रेल्वेचे चौथे रेल्वे टर्मिनस उभे राहत आहे.
या प्रकल्पाचे काम सुरुवातीला डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदारांमधील बदल, जमिनीचे प्रश्न आणि प्रशासकीय कारणांमुळे या कामाला विलंब झाला. आता रेल्वे प्रशासनाने या कामाला गती दिली असून प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
( नक्की वाचा : Thane Metro : ठाणेकरांनो, तयार राहा! गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो प्रवासाची काउंटडाउन सुरू, वाचा सर्व माहिती )
गर्दीचे विभाजन आणि प्रवाशांची सोय
जोगेश्वरी पूर्व भागात हे टर्मिनस उभारले जात असून ते सध्याच्या जोगेश्वरी उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ आहे. या ठिकाणाहून जेव्हीएलआर आणि मेट्रो मार्गिकांची कनेक्टिव्हिटी असल्याने प्रवाशांना प्रवास करणे सोपे जाणार आहे.
सीएसएमटी, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा आणि प्रवाशांचा भार कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना लांब पल्ल्याची गाडी पकडण्यासाठी दादर किंवा मुंबई सेंट्रलपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही.
प्रकल्पाचा खर्च आणि सुविधा
जोगेश्वरी टर्मिनसच्या उभारणीसाठी सुमारे 76.48 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा, पार्किंग आणि मेट्रोशी जोडणी असे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या जोगेश्वरी येथील यार्डचा वापर फक्त ट्रेन पार्किंगसाठी केला जातो, मात्र टर्मिनस पूर्ण झाल्यावर येथून नियमितपणे लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतील आणि तिथेच प्रवासाचा शेवट होईल.
दोन टप्प्यात होणार पूर्ण विकास
पहिल्या टप्प्यात येथे दोन प्लॅटफॉर्म तयार केले जाणार आहेत. यामध्ये एकाच वेळी तीन लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दररोज साधारण 24 रेल्वेंची ये-जा येथून होऊ शकते.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त प्लॅटफॉर्म, पिट लाईन आणि शंटिंग नेकचे काम केले जाईल. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मार्च 2027 पर्यंत या टर्मिनसचे संपूर्ण काम पूर्ण होऊन ते पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी सज्ज होईल.