Kalyan-Dombivli Political Conflict: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे एकत्र आल्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील 'पक्ष प्रवेशा' वरून सुरू असलेला राजकीय वादंग संपुष्टात आल्याचे चित्र आहे.पण त्याचवेळ कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात दोन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आठवडी बाजारावरून नवा वाद सुरू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, दोन्ही पक्षांतील राजकीय वातावरण तापले आहे.
पक्षांतराच्या वादावर पडदा
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यावरून राजकीय कुरघोडी सुरू केली होती.
या वादाची चर्चा राज्याच्या राजकारणापासून थेट दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचली होती. मात्र, डोंबिवली येथील एका विकास कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत या वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिले होते.
( नक्की वाचा : Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी )
'आठवडी बाजार'वादाचा नवा मुद्दा
पक्ष प्रवेशाचा वाद संपुष्टात आल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 30 मध्ये आठवडी बाजारावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने आले आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका रविना माळी आणि शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्यात हा नवा वाद सुरू झाला आहे. या दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपचा गंभीर आरोप
भाजपच्या माजी नगरसेविका रविना माळी यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, भाजप कार्यालयाच्या समोर जबरदस्तीने आठवडी बाजार भरवण्यात आला आहे. तसेच, अर्जून पाटील हे बंदूकधारी बाऊन्सर सोबत घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आठवडी बाजाराला आमचा विरोध नाही, पण त्यांनी तो दुसऱ्या ठिकाणी लावावा, अशी मागणी माळी यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Kalyan Dombivli : आता पाणी कपातीचे टेन्शन नाही! कल्याण-डोंबिवलीकरांना सर्वात मोठी Good News )
शिवसेनेचे उत्तर
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जून पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याकडील सुरक्षा ही गेल्या 25 वर्षांपासून असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, मी कोणाच्याही कार्यालयासमोर आठवडी बाजार लावला नसून, नागरिकांची मागणी होती म्हणून तो लावला आहे. यात माझा कोणताही वैयक्तिक फायदा नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
भोपर टेकडीत खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप केले जात आहेत,असे प्रत्युत्तर अर्जुन पाटील यांनी दिले आहे.
कल्याण-डोंबिवलीतील या नवीन वादावर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात आणि या राजकीय कुरघोडीवर कसा पडदा टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.