KDMC News: नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या तीव्र पडसाद आता थेट कल्याण डोंबिवली महापालिकेत उमटले आहेत. केडीएमसीच्या महासभेत या मुद्द्यावरून विरोधकांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानेही आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे एरवी एकमेकांचे वैरी मानले जाणारे ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक या आंदोलनाच्या निमित्ताने सभागृहात एकत्र आले होते, ज्यामुळे पालिकेच्या राजकारणात तुफान गदारोळ उडाला आहे.
नेमकं काय घडलं?
केडीएमसी महासभेचे कामकाज सुरू होताच दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत विरोधकांनी महासभा तातडीने तहकूब करण्याची मागणी लावून धरली. गोंधळ वाढल्याने महापौरांनी सुरुवातीला कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केले.
मात्र पुन्हा कामकाज सुरू होताच आंदोलन अधिक तीव्र झाले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नगरसेवकांनी वंदे मातरम् आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याने सभागृहात दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी झाली. अखेर महापौरांनी महत्त्वाचे विषय मंजूर करून घेत सभा तहकूब केली.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )
मनसेने सत्तेतून बाहेर पडावे, भाजपची थेट मागणी
या गदारोळानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मनसेच्या या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे. एकीकडे सत्तेत मलाई खायची आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांविरोधातच आंदोलन करायचे, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही. मनसेला आंदोलन करायचे असेल तर त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे, असा थेट इशारा दीपेश म्हात्रे यांनी दिला.
मनसेनं काय दिलं उत्तर?
भाजपाच्या या थेट आव्हानाला मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनीही तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले आहे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा अत्यंत अन्यायकारक असून त्याचा निषेध नोंदवणे आमचे कर्तव्य होते. हा मुद्दा सत्तेचा किंवा राजकारणाचा नसून थेट देशाच्या भवितव्याचा आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे, त्यामुळे आमची भूमिका अगदी स्पष्ट असल्याचे त्यांनी बजावले.
( नक्की वाचा : Badlapur News: साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पतीला संपवलं; गुन्हा पचला होता पण... )
'मनसे आमच्यासोबतच राहणार'
युतीतील या वादानंतर केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गट आणि मनसेने या आंदोलनासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती, अचानक अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नव्हते असे त्या म्हणाल्या.
मात्र मनसेच्या सत्तेतील अस्तित्वाबाबत बोलताना, मनसे आमच्यासोबत महायुतीत सत्तेत आहे आणि पुढेही कायम राहील, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपच्या मागणीतील हवा काढून घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून पेटलेला हा वाद आता स्थानिक राजकारणात चांगलाच तापला आहे.