KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार वाद पेटला आहे. भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या या शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शक सूचना दिल्या. मात्र, या कार्यक्रमाला पालिकेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याने लावलेल्या हजेरीवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
'KDMC आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखीलील मांजर'
नागरिकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी शिवसेनेच्या शिबिरात हजेरी लावणाऱ्या केडीएमसी आयुक्तांवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप केडीएमसी काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याने अशा प्रकारे एका राजकीय पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहिल्याने प्रशासकीय तटस्थतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: 'सत्ता बदलत राहते, पण...' आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची 'ती' पोस्ट चर्चेत )
कल्याण-डोंबिवली शहरात सध्या नागरिकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, आणि त्यातच महापालिकेच्या रुग्णालयात एका लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई मोडल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली होती. अशा प्रकारच्या गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी आयुक्तांकडे वेळ नाही, मात्र ते राजकीय पक्षाच्या शिबिराला हजेरी लावतात, असा आरोप करत काँग्रेसने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई; एक्स-रे काढताच आई-वडील हादरले )
आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
कामकाजाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही राजकीय विरोध शमलेला नाही. एका महापालिका आयुक्तांनी पक्षीय शिबिरात जाणे कितपत योग्य आहे, यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण वादावर आणि काँग्रेसने केलेल्या गंभीर आरोपांवर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.