जाहिरात

KDMC News: 'स्वतःच्या बुडाखालचा अंधार पाहा, किती लफडी...'; केडीएमसीत शिवसेना नेत्यांमध्येच ठिणगी! प्रकरण काय?

KDMC News: कल्याण डोंबिवलीत सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असून, त्यावरून एकाच पक्षाचे दोन बडे नेते समोरासमोर ठाकले आहेत.

KDMC News: 'स्वतःच्या बुडाखालचा अंधार पाहा, किती लफडी...'; केडीएमसीत शिवसेना नेत्यांमध्येच ठिणगी! प्रकरण काय?
KDMC News: या वादामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत.
कल्याण:

KDMC News: एका बाजूला सत्तेची ताकद आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत धुसफूस अशा कात्रीत सध्या कल्याण डोंबिवली महापालिका अडकली आहे. कल्याण डोंबिवलीत सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असून, त्यावरून एकाच पक्षाचे दोन बडे नेते समोरासमोर ठाकले आहेत. प्रशासनाच्या कारवाईला पाठिंबा द्यायचा की फेरीवाल्यांच्या बाजूने उभे राहायचे, यावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

केडीएमसीत शिवसेनेत अंतर्गत संघर्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सत्तारुढ शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. एका बाजूला शहरप्रमुख रवी पाटील हे फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरून आपल्याच पक्षातील नेत्यावर निशाणा साधला आहे. या वादामुळे पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसत असून, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )

फेरीवाल्यांचे आंदोलन आणि प्रशासनाची भूमिका

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी एका फेरीवाल्याने महापालिका अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासन अधिक आक्रमक झाले असून, मुख्य रस्ते आणि रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

या कारवाईच्या विरोधात फेरीवाला नेते भाऊ पाटील यांनी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. महानगरपालिका फेरीवाला कायद्याचे नियम पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या 12 वर्षात पालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले नाही आणि त्यांना अधिकृत परवानेही दिले नाहीत, असे भाऊ पाटील यांचे म्हणणे आहे.

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमधील 'हा' भाग झाला प्रदूषणाचा हॉटस्पॉट! देसाई खाडीत नेमकं काय घडलंय? वाचा सविस्तर )

अरविंद मोरे यांची रवी पाटलांवर सडकून टीका

या आंदोलनाला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला. प्रशासनाने फेरीवाला धोरण त्वरित लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली. 

स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी पाहावे, असे सुनावत त्यांनी रवी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. कोणासाठी लीडरशिप करता? बिल्डर लाईनमध्ये किती लफडी आहेत हे सर्वांना माहिती आहे, असे खळबळजनक वक्तव्य मोरे यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पक्षांतर्गत वादामुळे शहरात चर्चा

दुसरीकडे रवी पाटील हे सातत्याने फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासावर बोट ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरत आहेत. त्यांनी यापूर्वीही प्रशासनावर फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून दबाव निर्माण केला होता. 

मात्र, आता त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने रवी पाटील एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणावर आता पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेणार आणि या वादावर पडदा पडणार की तो अधिक चिघळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com