KDMC News : कल्याण डोंबिवलीचे बेपत्ता नगरसेवक 28 दिवसांनी प्रकट! पण, पुन्हा मोठा ड्रामा, पाहा नेमकं काय घडतंय

KDMC Politics: गेल्या 28 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले शिवसेना ठाकरे गटाचे तीन नगरसेवक अचानक कोकण भवनात प्रकटले.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

KDMC Politics: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर रंगलेलं राजकीय नाट्य आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलं आहे. गेल्या 28 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले शिवसेना ठाकरे गटाचे तीन नगरसेवक अचानक कोकण भवनात प्रकटले. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून हे नगरसेवक कुठे होते आणि कोणाच्या संपर्कात होते, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. आता त्यांनी आपली नोंदणी तर केली आहे, पण ते ठाकरे गटासोबत आहेत की नाही, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

तीन नगरसेवकांची कोकण भवनात नोंदणी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मतमोजणी झाल्यापासून त्यापैकी राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि मधुर म्हात्रे हे तीन नगरसेवक बेपत्ता होते. 

अखेर 28 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या तिघांनी कोकण विभागीय आयुक्तालयात जाऊन आपल्या नगरसेवक पदाची नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे मूळचे मनसेचे कार्यकर्ते असून त्यांनी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( नक्की वाचा : Dombivli : भाजपा नेत्यावरील हल्ला प्रकरणात डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांना मोठा दिलासा, वाचा कोर्टात काय घडलं? )

ठाकरे गटाच्या गटनेतेपदाचा पेच

शिवसेना ठाकरे गटाचे सुरुवातीला फक्त 7 नगरसेवक एकत्र आले होते, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचा गट स्थापन होण्यात अडचणी येत होत्या. महासभेत व्हीप बजावण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने पक्षाची कोंडी झाली होती. दरम्यानच्या काळात किर्ती ढोणे या नगरसेविका पक्षाच्या संपर्कात आल्या आणि त्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत सहभागी झाल्या. यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या 8 वर पोहोचली आणि त्यांचा गट स्थापन झाला. मात्र, उर्वरित तीन नगरसेवकांनी अद्याप आपली राजकीय दिशा स्पष्ट केलेली नाही.

Advertisement

 गटनेते उमेश बोरगावकर यांचा दावा

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. या तिघांनी सदस्यत्वाची नोंदणी केली असली तरी, आम्ही त्यांना आमच्या गटात सामील करून घेतलेले नाही, असा दावा बोरगावकर यांनी केला आहे. मात्र, या दाव्यामुळे आता नवा प्रश्न उपस्थित होत आहे की, 

बोरगावकर यांनी या नगरसेवकांना गटात घेतले नाही की हे नगरसेवक स्वतःहून पक्षात जाण्यास तयार नाहीत? 15 फेब्रुवारी ही नोंदणीची शेवटची तारीख असल्याने या तिन्ही नगरसेवकांच्या हालचालींना वेग आला आहे.

Advertisement

मशाल चिन्हावर निवडून येऊनही पक्षाच्या प्रक्रियेपासून लांब राहिलेल्या या तीन नगरसेवकांना ठाकरे गटाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमेश बोरगावकर लवकरच यासंदर्भात सविस्तर खुलासा करण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात ठाकरे गटाची ताकद वाढणार की पेच कायम राहणार, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
 

Topics mentioned in this article